News

ज्यो बायडेन यांची अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतून माघार; या कारणांमुळं घेतली माघार, आता ट्रम्प विरूद्ध कोण लढणार? | Us Election 2024

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (US President Joe Biden) यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून (Us Election 2024) माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. अमेरिका आणि पक्षाच्या हिताच्या दृष्टीने मी हा निर्णय घेतल्याचं बायडेन यांनी स्पष्ट केलं आहे. लवकरच ते देशाला संबोधित करतील.

चार दिवसांपूर्वीच बायडेन यांना कोरोनाची बाधा झाली होती. रविवारी बायडेन यांनी एक चिठ्ठी लिहून राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघारीचा निर्णय जाहीर केला. बायडेन यांनी डॅमोक्रेटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांना समर्थन देण्याविषयी मत व्यक्त केलं आहे. कमला हॅरिस भारतीय वंशाच्या असून सध्या त्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत.

येत्या चार महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक (US presidential election) होणार आहे. तत्पूर्वी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रेसिडेंशियल डिबेट खूप महत्त्वाची असते. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यामध्ये मागच्या महिन्यात प्रेसिडेंशियल डिबेट झाली. यावेळी बायडेन अनेकदा अडखळताना दिसले. अनेक प्रसंगात ते खूप विचार करुन उत्तर देत होते. त्यामुळे संपूर्ण डिबेटमध्ये ट्रम्प यांचीच हवा दिसून आली. या डिबेटनंतर ट्रम्प यांनी बायडेन यांच्या खराब प्रकृतीवरुन हल्लाबोल केला. प्रेसिडेंशियल डिबेट मध्ये त्यांची एक प्रकारे हार झाल्यानं निवडणूक लढवण्यासाठी मिळणाऱ्या निधीमध्येही मोठी घसरण झाली.

त्याचबरोबर ज्यो बायडेन यांचं वाढत वय आणि स्मृती दोष यावर देखील सतत प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं. काही ठिकाणी बायडेन अडखळल्याचे, चालता चालता पडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळं त्यांच्या आरोग्याबद्दल अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. तसेच NATO समिटमध्ये युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांना ते पुतिन म्हणाले. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं नावच विसरले, त्यांना ट्रम्प म्हणून बोलावलं. अशा अनेक घटनांमुळं बायडेन यांना विरोध वाढत चाललेला दिसत होता.

तसेच बायडेन यांनी माघार घ्यावी यासाठी डेमोक्रॅट्स पक्षातून देखील प्रयत्न केले जात होते. अखेर आता बायडेन यांनीच निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून बायडेन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘अमेरिकेसारख्या बलशाही देशाचं राष्ट्राध्यक्षपद भूषवणं हा सर्वोच्च सन्मानाचा क्षण आहे असं बायडेन यांनी म्हटलं आहे. पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्याची माझी इच्छा आणि तयारी होती. पण देशाचं आणि डेमोक्रॅट्स पक्षाचं हित लक्षात घेऊन मी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष या नात्याने उर्वरित काळ मी माझे कर्तव्य पार पाडेन, असं बायडेन यांनी म्हटलं आहे.

Back to top button