News

चित्री नदीवरील बंधाऱ्यात बुडून वकिलासह तिघांचा मृत्यू

कोल्हापूर | आजरा पासून जवळच असलेल्या चित्री नदीवरील परोली बंधाऱ्यात वकिलासह तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली आहे. मृतांमध्ये फिलिप अंतोन कुतिन्हो (वय ४०, रा. पुणे), लॉईड पास्कोन कुतिन्हो (वय ३५) आणि ॲड. रोझिरियो अंतोन कुतिन्हो यांचा समावेश आहे. ऐन नाताळ सणाच्या कालावधीत घडलेल्या या घटनेमुळे ख्रिश्चन समाजावर शोककळा पसरली आहे. आजरा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

नाताळ साजरा करण्यासाठी आले होते कुटुंब

नाताळ सणानिमित्त कुतिन्हो कुटुंबातील सदस्य पुण्यातून आजऱ्यात आले होते. २५ डिसेंबरला त्यांनी नाताळ साजरा केला. रविवारी (दि. २९ डिसेंबर) त्यांच्या नातलगांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तिघेही परोली बंधाऱ्यावर पोहायला गेले. दुपारी पोहत असताना तिघे बुडाल्याचे कळताच मित्र आणि नातेवाईकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न अयशस्वी ठरले. घटनास्थळी स्थानिकांनी शोध घेतला असता दोघांचे मृतदेह त्वरित मिळाले, तर तिसरा मृतदेह काही वेळाने हाती लागला.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

फिलिप आणि ॲड. रोझिरियो हे सख्खे भाऊ होते, तर लॉईड त्यांचा चुलत भाऊ होता. ॲड. रोझिरियो आजरा न्यायालयात वकिली करत होते, तर लॉईड नेव्ही मर्चंटमध्ये कार्यरत होते. तिघांनाही पोहण्याचा सराव होता की नाही, याचा तपास पोलिस करत आहेत.

बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे अपघात

चित्री बंधाऱ्यातून पाणी सोडल्याने बंधाऱ्याच्या आसपासचा भाग खोल झाला होता. यामुळेच हा दुर्दैवी अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे आजरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button