Tuesday, October 3, 2023
HomeCareerपरदेशात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांना ‘Maharashtra International’च्या माध्यमातून मिळणार मदत, जाणून घ्या सविस्तर

परदेशात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांना ‘Maharashtra International’च्या माध्यमातून मिळणार मदत, जाणून घ्या सविस्तर

मुंबई | राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे एक नवी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेतर्फे ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल – Maharashtra International’ या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्रास प्रारंभ होत आहे.

आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्रामार्फत परदेशात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्यातील  उमेदवारांची नोंदणी, माहिती संकलन तयार करणे, प्रशिक्षण देणे हे उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून प्रथमच नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्र निर्माण करण्यात आले असून यामध्ये राज्यातील कुशल आणि अकुशल उमेदवारांसाठी इतर देशांमध्ये आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देणे आणि आंतरराष्ट्रीय सल्लागार सेवांचा लाभ देता येणार आहे.

‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या  आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी आयटीआयमधील 58 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभही राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे दुपारी 4 वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील  आयआयटी मधून जपानमध्ये 3 आणि जर्मनीमध्ये 55 अशा परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या 58 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलिया, जपान, स्पेन, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, युनायटेड किंगडम, यूएसए, दक्षिण कोरिया, थायलंड आणि इतर अनेक प्रमुख देशांचे वाणिज्यदूत उपस्थित राहणार आहेत. भारतात कार्यरत असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय रोजगार मदत केंद्र त्याचबरोबर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त एन.रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी उपस्थित राहणार आहेत.

तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात यांची उपस्थिती लाभणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular