मणिपूरचा पुरुषी उन्माद पाहून काही काळ अस्वस्थ व्हायला झालं. पण बिल्कीस बानो आठवताच, डबल इंजिन असलेल्या राज्यात असे प्रकार घडले नसते तर मात्र नवल वाटले असते अशी मनाची समजूत काढली.
ज्या देशात दुधाचे दात न पडलेल्या चिमुरड्या लेकराला हिंदू मंदिरांत डांबून आळीपाळीने कुस्करले गेले. त्या नराधम बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ भाजप या राजकीय पक्षाच्या समर्थकांनी हातात देशाचे तिरंगे घेऊन मोर्चा काढला. आणि देशातील सुजाण नागरिक षंढासारखे शांत बसले. त्या देशात अजून दुसरे काय होणार?
डबल इंजिन असलेल्या गुजरात राज्यातील बिल्कीस बानो या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार केला गेला. तिच्या डोळ्यादेखत लेकराला ठार केले. न्यायालयाने नराधम गुन्हेगारांना शिक्षा सुनावली. तरीही आरोपी हिंदू संस्कारी ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची शिक्षा राजकीय सत्तेने रद्द केली. आणि उर्वरित देश षंढासारखा गप्प बसला. त्या देशात अजून दुसरे काय होणार?
देशभरातील अशी उदाहरणे द्यायची झाली तर किमान एक पुस्तक प्रसिध्द करता येईल. नपुंसक पुरुष आपले शौर्य सिध्द करण्यासाठी नेहमी असहाय स्त्रीयांवर सामूहिक अत्याचाराचाच मार्ग का निवडतात? हा प्रश्न म्हणजे आजवर न सुटलेलं कोडं आहे.
शत्रूच्या स्त्रियांचा आदर ‘परस्त्री मातेसमान’ मानून करणारा राजा आमच्या भूमीवर घडून गेला. त्या राजाच्या स्त्रीदाक्षिण्याला सद्गुण विकृती म्हणत शत्रुच्या स्त्रीयांवर अत्याचार करा, अशी शिकवण देणारा सावरकरही याच मातीतला. पण सत्ताधारी राज्यकर्ते जेव्हा अशा सावरकराचा पुरस्कार करतात, तेव्हा तरुण युवकांच्याकडून स्त्री सन्मानाची अपेक्षा ठेवता येईल का?
याच देशात गुजरातच्या भूमीत जन्म घेतलेला गांधी बाबा घडून गेला. ज्या देशात स्त्रीयांना अंगभर वस्त्र मिळत नाही त्या देशात सुटाबुटात वावरणे योग्य नाही. म्हणत वितभर पंचा घेऊन आयुष्यभर वावरला. त्याची हत्या करणाऱ्या आद्य दहशतवाद्याच्या नावाने महाराष्ट्रातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी मतदान करत पारंपरिक कर्मचारी संघटनांचा पराभव केला. अशांकडून काय अपेक्षा ठेवायच्या?
लोकांची चव बदललीय हे अर्धसत्य आहे. लोकांना राजकीय वरदहस्त आहे हे पूर्णसत्य आहे. मणिपूरमध्ये खूप दिवस इंटरनेट बंद असल्याने तिकडील अमानुष अत्याचाराच्या घटना आता आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. मणिपूर मधील जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना ४ मे २०२३ रोजीची आहे.
व्हिडिओ मध्ये अत्याचारी स्पष्ट दिसत असतानाही पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. का? कारण राजकारण!
देशाचे पंतप्रधान नवीन संसदेत सेंगोल घेऊन व्हिडिओ चित्रीकरणासाठी ‘पालथे’ झोपले होते. तेव्हा मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड निघत होती. तिकडील कायदा सुव्यवस्था पालथी करण्याचे पापही पंतप्रधानांचेच! मणीपूर हिंसाचारावर देशाचे हे प्रधानमंत्री महोदय तब्बल तीन महिन्यांनी जागे झालेत. तेही इतका मन्न सुन्न करणारा व्हीडीओ समोर आल्यावर, अर्थात अगदीच तोंड लपवू शकत नसल्याची पाळी आल्यानंतर! दिल्लीत राष्ट्रीय महिला खेळाडू रस्त्यावर तिरंग्यासोबत तुडवल्या जात होत्या, तरीही हे मौनातच… पण हा इतिहास लिहिला गेला आहे. हा कसला पुरुषी अहंकाराचा दर्प? हे कसले हिंदुत्व?
महिला सन्मान आणि महिला अत्याचार यावर आभाळ हेप्पलणाऱ्या बायांनी राजकीय पक्ष बदललेत. आता त्यांना फक्त महिलांचा विकास दिसतो. कारण रस्त्यावर नागवी करुन धिंड काढली जाणारी महिला त्यांच्यालेखी महिलाच नसते. कालचा खूनी, बलात्कारी आज त्यांच्यासाठी मंत्री भाऊराया असतो. त्याच्या सतरंज्या त्यांना उचलायच्या असतात. हाच त्यांचा स्त्रीवाद असतो.
जन्माने हिंदू आणि भारतीय नसलेल्या सोनिया गांधी यांनी स्वकर्तृत्वाने या देशाचे नागरिकत्व, धर्म, परंपरा स्विकारल्या. स्वकर्तृत्वाने राजकीय सत्ता खेचून आणली. १० वर्षे देशात सत्ता राबवली. पण आजच्या सत्ताधाऱ्यांसारखे स्त्रीयांवर अत्याचार होवू दिले नाहीत! देशाच्या वाट्टोळ्याला जितके सत्ताधारी जबाबदार आहेत. तितकेच भाजपाला बहुमत देणारे मतदार जबाबदार आहेत!!
– तुषार गायकवाड