भुसावळ | जळगाव जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी भुसावळ शहरातील नागरिकांनी सातत्याने लावून धरली होती. या मागणीला यश मिळण्याची शक्यता असून २६ जानेवारी २०२५ रोजी राज्य सरकारकडून २१ नवीन जिल्ह्यांची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची चर्चा आहे. जळगाव जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन भुसावळ जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचे बोलले जात आहे.
नवीन भुसावळ जिल्ह्यात भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, यावल, रावेर या सहा तालुक्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर वरणगाव (भुसावळ तालुका), शेंदुर्णी (जामनेर तालुका), व फैजपूर (यावल तालुका) या भागांना स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विकासाला चालना देणारा निर्णय
भुसावळ जिल्हा झाल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल. सर्व शासकीय कार्यालये कार्यान्वित होऊन नागरिकांना जळगावला जाण्याची गरज कमी होईल. याशिवाय, या जिल्ह्यातील खासदारांची एक जागा वाढण्याची शक्यता असून, नागरिकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होतील.
सात वर्षांपासून प्रलंबित प्रस्ताव
राज्य सरकारने २२ नवीन जिल्हे आणि ४९ तालुक्यांच्या निर्मितीसाठी २०१८ साली समिती स्थापन केली होती. या समितीने जळगाव जिल्ह्याचा पूर्व भाग विभाजित करून भुसावळ जिल्हा तयार करण्याचा प्रस्ताव दिला होता. आमदार संजय सावकारे यांनी या मागणीचा पाठपुरावा केला होता.
नवीन जिल्ह्यासाठी सात वर्षांपूर्वी ३५० कोटींच्या खर्चाचा अंदाज
नवीन जिल्हा निर्मितीसाठी सात वर्षांपूर्वी सुमारे ३५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र आता हा खर्च कित्येक पटीने वाढला असण्याची शक्यता आहे. सध्या भुसावळ येथील उपलब्ध शासकीय कार्यालये, महसूल विभाग, पोलिस विभागाच्या सुविधा आणि इमारती यामुळे खर्च किती होईल याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.
जिल्हा निर्मिती का आवश्यक?
यावल, रावेर, मुक्ताईनगर आदी तालुक्यांतील दुर्गम भागातील नागरिकांना जळगावला जाण्यासाठी १२५-१४० किमीचे अंतर कापावे लागते. यामुळे वेळेचा आणि आर्थिक खर्च होतो. भुसावळला जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यास नागरिकांचे हे अडथळे दूर होतील.
भुसावळ जिल्ह्यासाठी पूरक स्थिती
भुसावळ हे जळगाव जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून, या ठिकाणी शासकीय इमारती, न्यायालय, ट्रामा सेंटरसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर भुसावळ जिल्हा निर्मितीची मागणी पूर्ण होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.