आमच्या गल्लीतल्या कोंबड्याची व्यथा… सुधाकर काशीद
तालमीच्या बोर्डावर टेंबलाबाई जत्रंची पाटी काल वाचली आणि बघा माझी बीपीच वाढली. रातभर डोळा लागला नाही. आज पहाटं आरवायला गेलो तर गळ्यातनं आवाजच फुटना. पाच सहा दिवस झालं गिरणी वाल्याचा पम्या आणि जाधवाचा आश्या मला गल्लीत बघितलं की थांबतात आणि \”तुझा या आषाढात फडशाच पडतो\” अस मुद्दाम जोरात म्हणत्यात. लई भीती वाटत्या ओ.
आता तर म्हणं..
तापून लाल भडक झालेल्या शेगडीत आम्हाला भाजत्यात. डाव्या मांडीत सळी कोंबुन अडकून ठेवत्यात. खरच भ्या वाटतय. मी तुमच्या गल्लीत सात आठ वर्ष हाय. कुणाच्या अद्यात का मद्यात नाय. दिवसभर चरतोय. दिवस मावळला की माझा मी खुराड्यात जातोय. पहाटं न चुकता आरावतोय. मी आरवलंकी पाटलाची माई खराटा घिऊन दरवाजा लोटायला बाहेर येती. दारात पाणी मारती. रांगोळी काढती. मी आजवर कवा तीच्या रांगोळीवर चुकुनबी पाय ठेवला नाय… आणि पम्या ,आश्या माझा आषाढात फडशाच पाडतो ,फडशाच पाडतो अस सारखं का म्हणत्यात कळतचं न्हाई. सांगा की कुणीतरी तेनला…
सुधाकर काशीद – तरूण भारत (कोल्हापूर संपादक)