Teacher Recruitment 2025 : राज्यात 10 हजार शिक्षकांची भरती; 20 जानेवारीपासून भरती प्रक्रियेला सुरूवात.. जाणून घ्या अधिक माहिती

शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्यातील खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांसह नगरपालिका, महापालिका शाळांमधील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा २० जानेवारीपासून सुरु होणार आहे. यातारखेनुसार पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यास प्रारंभ होणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया तातडीने सुरु करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसीत करण्याचे काम तलिस्मा कार्पोरेट प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले असून २० जानेवारीपासून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल.


Teacher Recruitment 2025: राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. राज्यातील जवळपास १८ ते १९ हजार शिक्षकांची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात भरती करण्यात आली आहे, आणि दुसऱ्या टप्प्यात १० हजार शिक्षकांची भरती केली जाईल.

शिक्षण विभागातील विविध मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी भुसे यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर, शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भुसे यांनी सांगितले की, शिक्षक भरतीसाठी संचमान्यता आणि पट पडताळणी केली जाईल, ज्यामुळे रिक्त जागा स्पष्ट होतील. दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात भरतीपासून वंचित राहिलेल्यांना संधी मिळणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२० नुसार कार्यवाही पूर्ण केली आहे. पोर्टलवर जाहिरात नोंदणीची सुविधा सोमवारपासून सुरू होईल, ज्यामुळे जिल्हा परिषदेकडील उर्वरित रिक्त जागा, अपात्र उमेदवार, गैरहजर किंवा रुजू न झालेले उमेदवार यांच्यावर विचार करण्यात येईल.