मुंबई | देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या टाटा समूहाने (Tata Group) त्यांच्या मालकीच्या एअर इंडियासाठी महाराष्ट्रातील अमरावती येथे प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या प्रशिक्षण संस्थेतून दरवर्षी 180 व्यावसायिक वैमानिकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे.
टाटा समूह उभारत असलेली ही उड्डाण प्रशिक्षण संस्था (FTO) दक्षिण आशियातील सर्वात मोठी प्रशिक्षण संस्था असणार आहे, असे एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही संस्था सुरु होईल अशी शक्यता आहे.
इंडिया एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, देशात स्थापन झालेली पहिली प्रशिक्षण सुविधा असणार आहे. यात प्रशिक्षणासाठी 31 सिंगल इंजिनची विमाने आणि तीन ट्विन इंजिनची विमाने असतील. एअर इंडियाला, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) कडून 30 वर्षांसाठी सुविधा उभारण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन, व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणाले, अमरावतीमधील FTO चा उद्देश भारतीय विमान वाहतूक अधिक स्वावलंबी बनवणे आणि भारतातील तरुणांच्या वैमानिक म्हणून उड्डाण करण्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे हा आहे. तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. या FTO मध्ये प्रशिक्षित तरुण पायलट एअर इंडियाच्या जागतिक दर्जाची एअरलाइन बनण्याच्या महत्त्वाकांक्षेला चालना देतील.
MADC च्या उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे म्हणाल्या, MADC आणि Air India यांच्यातील सहयोगी उपक्रमामुळे विमान वाहतूक क्षेत्रात केवळ 3,000 हून अधिक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार नाहीत तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.