टाटा ग्रुप ऑफ कंपनीज हा देशातला अग्रगण्य कॉर्पोरेट समूह. या ग्रुपमध्ये काम करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक उच्चशिक्षित तरुणाची इच्छा असते. टाटा ग्रुप ऑफ कंपनीजने टाटा ग्लोबल इंटर्नशिप प्रोग्रामसाठी इच्छुक तरुणांकडून अर्ज मागवले आहेत. परिवर्तनशील, व्यापक दृष्टिकोन असलेले आणि परिश्रमाची तयारी असलेले तरुण या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज करू शकतात. इंटर्नशिपसाठी टाटा समूहाने काही निकष निश्चित केले आहेत. कंटेंट डॉट टेकगिग डॉट कॉम
ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
जगभरातल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून टाटा समूहाच्या अनेक संस्थांमधल्या उत्कृष्ट प्रकल्पांमध्ये त्यांना सहभागी करून घेणं आणि जगातल्या सर्वांत वेगाने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या अर्थव्यवस्थेत त्यांना काम करण्याचा अनुभव मिळावा हा टाटा ग्लोबल इंटर्नशिपचा उद्देश आहे. यासाठी टाटा समूहाने इच्छुक तरुणांकडून अर्ज मागवले आहेत. ही तरुणांसाठी एक सुसंधी आहे.
भारताबाहेरचं कॉलेज किंवा विद्यापीठात कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले, कुठल्याही क्षेत्राचं शिक्षण घेत असलेले आणि कोणत्याही देशाचे विद्यार्थी, टाटा ग्लोबल इंटर्नशिप प्रोग्रामद्वारे इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी, शिकण्याची आवड, परिश्रम घेण्याची तयारी आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व बाजू चाणाक्षपणे तपासून पाहण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध टाटा समूह घेत आहे.
यासाठी हार्वर्ड, इन सिड, येल, एमआयटी, कॉर्नेल, एलएसई, केम्ब्रिज, एनयूएस, एनटीयू, बोकोनी, आयईएसई यांसारख्या जगभरातल्या नामांकित संस्थांमधून शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतात. टाटा ग्लोबल इंटर्नशिप प्रोग्राममध्ये सहभागी झालेल्या तरुणांना टाटा समूहात सहा ते 12 आठवड्यांचा सर्वसमावेशक कामाचा अनुभव मिळेल. टाटा ग्लोबल इंटर्नशिप प्रोग्राम ही तरुणांना शिकण्याची एक संधी असेल.
या प्रकल्पात सहभागी तरुणांना भारतातल्या वेगवेगळ्या प्रकल्पांना भेटी देता येतील. या प्रकल्पातली काही कामं तरुण इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीच्या मदतीनं घरबसल्या आरामात पूर्ण करू शकतील.
या इंटर्नशिपदरम्यान इंटर्न्सना व्यवसाय, संस्कृतीशी संबंधित अनेकविध गोष्टी अनुभवायला मिळतील. इंटर्नशिप कालावधीत भारत आणि टाटा समूहाचं विश्व एकत्रित अनुभवायला मिळेल. या व्यावसायिक फेलोशिपमुळे तयार झालेलं एक नातं आयुष्यभर सोबत असेल.
टाटा ग्लोबल इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ आणि सोपी आहे. यासाठी एक साधा अर्ज भरावा लागेल. तसंच वैयक्तिक माहितीसह एक रेझ्युमे सबमिट करावा लागेल. त्यानंतरच्या टप्प्यात असिंक्रोनस व्हिडिओद्वारे मुलाखतीसाठी सूचना दिल्या जातील. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळेनुसार रेकॉर्ड करून अपलोड करू शकता. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात ग्रुपमधले महत्त्वाचे व्यावसायिक अधिकारी व्हिडिओद्वारे मुलाखत घेतील.
या इंटर्नशिप प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्हाला एखाद्या विशिष्ट प्रकल्पावर काम करण्याची, त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची, तसंच टाटा समूहाची व्यावसायिक उद्दिष्टं जाणून घेण्याची संधी मिळेल.