आज सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशाचे आगमन झाले आहे. भारतातच नाही तर, परदेशातील गणेशभक्तांमध्ये देखील यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. भारतात गणेशाला प्रथम पूज्य मानले जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात बाप्पाचे स्थान अढळ असल्याचे दिसते. गणेशोत्सव भारतात सर्वत्र आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे गणेशाची सर्वात मोठी किंवा उंच मूर्ती आपल्या भारतातच असेल असे सर्वाना वाटते. परंतु गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती भारतात नाही, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.. चला तर जाणून घेऊया जगातील सर्वात उंच गणेशमुर्ती कोणत्या देशात आहे याबद्दल सविस्तर..
गणपतीच्या उंचीच्या बाबतीत बोलायचे झाले, तर जगातली गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती भारतात नाही. तर जगातील सर्वात उंच गणेशमूर्ती थायलंड देशाच्या ख्लॉन्ग ख्वान्ग शहरामध्ये आहे. या शहरामध्ये गणेश इंटरनॅशनल पार्क बनवण्यात आले असून, तिकडेच ही 39 मीटर उंच गणपतीची कांस्याची मूर्ती साकारण्यात आली आहे.
थायलंडमध्ये गणपतीला ज्ञान आणि बुद्धीची देवता मानतात
थायलंडमध्येही गणपतीला ज्ञान आणि बुद्धीमत्तेची देवता म्हणून मानले जाते. थायलंड मधील या गणेश मूर्तीच्या डोक्यावर कमळाचे फूल आणि त्यामध्ये ओम लिहिलेले आहे. या मूर्तीला कांस्याच्या 854 वेगवेगळ्या भागांपासून बनवण्यात आले आहे. गणपतीच्या मूर्तीसह हे पार्क बनवायला 2008 ते 2012 अशी 4 वर्ष लागली आहेत. थायलंडमध्ये जी 4 फळे पवित्र मानली जातात, त्या फळांना गणपतीच्या हातात ठेवण्यात आले आहे. यामध्ये फणस, आंबा, ऊस आणि केळं यांचा समावेश आहे. थायलंडमध्ये आंबा फळाला समृद्धीचे प्रतिक मानले जाते. या गणपतीच्या पोटावर सापाने वेटोळे घातले आहे, तर सोंडेमध्ये लाडू आणि पायाखाली उंदीर असल्याचे दिसत आहे.
थायलंडमध्ये गणपतीची ही मूर्ती का बनवली गेली याचा किस्साही फार महत्वाचा आहे. थायलंडमधली अयोध्या म्हणजेच अयुथ्या साम्राज्याबाबत विस्ताराने वाचले असता, याचे दाखले मिळतात. या साम्राज्यामध्ये चाचोएंगशाओ नावाचे शहर 1549 मध्ये वसवण्यात आले होते. याच शहराची चाचोएंगशाओ असोसिएशन ही संस्था धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असते. या असोसिएशनचे अध्यक्ष पोल जेन समाचाई वानीशेनी यांनी जगातली गणपतीची सगळ्यात मोठी मूर्ती बनवण्याचा मानस तेव्हा व्यक्त केला होता. तसेच यासाठी त्यांनी जागाही शोधायला सुरूवात केली होती.
चाचोएंगशाओ असोसिएशन संस्थेने यासाठी ख्लॉन्ग ख्वान्ग शहरात 40 हजार वर्ग मीटर जागा निश्चित केली. ही जमीन सुपीक आणि कृषीप्रधान क्षेत्र असल्यामुळे ही जागा गणपतीची मूर्ती स्थापन करण्यासाठी निवडण्यात आली होती. याच जागेवर अलिकडे सगळ्यात आधी या जागेवर इंटरनॅशनल गणेश पार्क बनवण्यात आले. यानंतर मूर्तीची स्थापना करण्यात आली.
जगातील सर्वात उंच असणारी ही गणेश मूर्ती तिथले प्रख्यात मूर्तीकार पिटक चर्लेमलाओ यांनी तयार केली आहे. गणपतीची ही मूर्ती जगातली सगळ्यात उंच असून अजूनपर्यंत कोणीही यापेक्षा उंच मूर्ती असल्याचा दावा केला नसल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

चाचोएंगशाओ असोसिएशनने याठिकाणी एक सेंट्रल म्युझियमही बनवले आहे. स्थानिक इतिहासाचे संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी हे म्युझियम बनवण्यात आले आहे. या भागामध्ये कित्येक शतकांपासून हिंदू संस्कृती नांदत आहे. मागच्या काही वर्षांपासून थायलंडच्या बँक पॅकांग नदीच्या आसपासचं क्षेत्र सगळ्यात मोठं पर्यटन क्षेत्र झाले आहे. त्यामुळे तिथले लोक आंतरराष्ट्रीय देवाची सगळ्यात मोठी मूर्ती तिकडेच असावी, अशी मागणी करत होते. अखेर गणपतीची मूर्ती बसवण्यावर सगळ्यांची सहमती झाल्यानंतर ही मुर्ती बसवण्यात आली आहे.
भारतातील उंच मुर्ती इंदौरला
गणपतीच्या उंच मुर्ती बाबत भारताबद्दल विचार करतांना इंदौरमध्ये स्थित गणपतीची 25 फूट उंच मूर्ती ही भारतातील सर्वात उंच मूर्ती आहे. 1875 मध्ये या मूर्तीची स्थापना केली गेली. तथापि, बरेच लोक असे मानतात की उत्तर प्रदेशच्या संभळ जिल्ह्यात भारतातील सर्वात उंच गणेश मूर्ती आहे.