मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या तलाठी पदभरती (Talathi Bharti 2023) संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने 75 हजार जागांवर मेगाभरती करण्याचा संकल्प केला असला तरी अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि वारंवार आश्वासन देण्यात आलेल्या तलाठी पदभरतीची जाहिरात अद्यापही न आल्याने सर्वसामान्य पदवीधरांचा प्रचंड हिरमोड झाला होता. मात्र नवीन अपडेट नुसार सध्या भरतीच्या हालचालींना वेग आला असून लवकरच तलाठी भरती होणार आहे.
राज्यात तलाठीच्या 4112 जागा रिक्त असतानाही महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे पदभरती रखडली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाजमाध्यमांवर तसेच डिसेंबर 2022 मधील विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरामध्ये तलाठी पदभरती करण्याचे सूतोवाच केले असले तरी पदभरतीचा मुहूर्त जुळून आलेला नाही. जिल्हा निवड समितीद्वारे 2015 च्या आधीपर्यंत तलाठी पदभरती ही एखादा अपवाद सोडल्यास दरवर्षी होत असे. परंतु 2016 आणि त्यानंतर थेट 2019 मध्ये पदभरती घेण्यात आली. त्यानंतर अद्यापही भरती झालेली नाही. (Talathi Bharti 2023)
महसूल व वन विभागाचा डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार नव्याने 3110 तलाठी पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली होती. पूर्वीच्या 1012 रिक्त पदांसह 4112 पदांची भरती करण्याचे शासनाद्वारे वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, भरती प्रक्रिया अद्यापही रेंगाळलेली आहे. शिंदे- फडणवीस सरकारने पारदर्शक पदभरतीसाठी टीसीएस आणि आयबीपीएससारख्या विश्वासू संस्थांची निवड 2022 च्या शासन निर्णयाद्वारे केली. त्यानंतर तलाठी भरतीला गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अद्याप काहीच झालेले नाही.
1. नाशिक विभाग 1035
2. औरंगाबाद विभाग 847
3. कोकण विभाग 731
4. नागपूर विभाग 580
5. अमरावती विभाग 183
6. पुणे विभाग 746
आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख विभाग यांच्या अध्यक्षतेखाली टीसीएस तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत 4 मे 2023 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही. त्यामुळे तलाठी पदभरती संदर्भात फक्त कागदी घोडे नाचवून विविध परिपत्रकांच्या भडिमारामुळे उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे कुठलेही परिपत्रक जाहीर न करता सरळ जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. त्यामुळेच आता पदभरतीच्या हालचालींना वेग आल्याचे सांगितले जात आहे.