…अन् भरसभेत Suresh Dhas यांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
Suresh Dhas on Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्याप्रकरणात भाजपा आमदार सुरेश धस यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांचा भडीमार केला आहे. धनंजय मुंडेंविरोधात विविध आरोप करत त्यांनी मुंडे यांना आकाची उपमा दिली आहे. अनेक भाषणांत सुरेश धस या सर्व प्रकरणात धनंजय मुंडेचं थेट नाव न घेता आकाचा हात असल्याचा उल्लेख करत होते. मात्र आज त्यांनी थेट जाहीर सभेतच या आकाचा फोटो दाखवून खळबळ उडवून दिली. ते धाराशिव येथे जनआक्रोश सभेत बोलत होते.
ड्रग्स प्रकरणाचा धागा मुंडेंशी
सभेत धस यांनी एका मोठ्या ड्रग्स प्रकरणातही धनंजय मुंडेंचं नाव उघड केलं. “तीन दिवसांत ८९० कोटींच्या ड्रग्स प्रकरणात अटक झालेल्या कैलास सानप आणि आंधळे यांच्यासोबत धनंजय मुंडेंचा फोटो आहे. हेच या प्रकरणातील मुख्य आका आहेत,” असे ते म्हणाले.
कुत्र्याचं पिल्लू गेलं तरी आपली वाईट अवस्था होते
“कुत्र्याचं पिल्लू गेलं तरी आपली वाईट अवस्था होते. पण संतोष देशमुख हे पाण्यासाठी कळवळत होते. पाणी पाजा म्हणत होते. पण त्यांनी पाणी पाजलं नाही, दुसरं काहीतरी पाजलं. धायमोकलून रडत होता माणूस, त्याचा व्हिडिओ काढला अन् दुसऱ्याला दाखवले. तिकडू आका सांगत होता बहोत मारो.. तुम्ही आमच्या संतोषच्या तोंडात मारून माघारी पाठवायचा होता. केजमधून धिंड काढायची होती, पण यापद्धतीने मारायला नको होतं. तुमच्या मनगटात जास्त जोर आलाय, माज आलाय. पण तुम्ही आमच्या संतोषला या पद्धतीने मारलं”, असं सुरेश धस म्हणाले.
मकोकाच्या कारवाईची मागणी
धस यांनी, हत्याप्रकरणातील सात आरोपींवर मकोका लागला असून, उर्वरित आरोपींवरही त्वरित मकोका लावावा, अशी मागणी केली. “धनंजय मुंडे यांचा या हत्याप्रकरणाशी थेट संबंध आहे,” असा गंभीर आरोप करत धस यांनी मुंडेंवर ३०२ कलमांतर्गत कारवाईची मागणी केली आहे.