अण्णा जरा दमानं… संतोष देशमुखांच्या मृत्युप्रकरणाचं गांभीर्य महाराष्ट्राला तुमच्यामुळे कळालयं! Suresh Dhas
श्रेणिक नरदे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार
मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा निर्घृण खून झाला. या प्रकरणातील एक वगळता सर्व आरोपी सापडले आहेत. या प्रकरणाचं गांभीर्य संपूर्ण महाराष्ट्राला कळालं ते आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यामुळे. सुरेश धस यांचा पक्ष कोणताही असो काहीही असो ते लोकप्रिय आहेत. त्यांची वक्तृत्वशैली खास आहे. त्यांचा खूप आधीपासून चाहता आहे.
विधानसभेत संतोष देशमुख यांचं हत्याकांड त्यांनी लावून धरलं. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्या कुटूंबियांना मदत केली. जे काम पोलिस खात्याने किंवा गृहखात्याने करायला हवं, जे काम माध्यमांनी करायला हवं ते सुरेश धस करत आहेत. याबद्दल कसलीही शंका नाही.
बीडमधील परळी पॅटर्न चा बुरखा टराटरा फाडला तो धसांनीच. कुणी म्हणत असेल सूरेश धसांना आजच जाग आली काय? तर ते चूकीचे आहे. विरोधात राहून आरोप करणे सोपे नसते. त्याहून सत्ताधारी बाजूला राहून आरोप करणेही सोप्पं नसते.
परळी मधील खून, परळीतील थर्मलची राख, रेती, मटका, बिअर बार, केमिकल ताडी, पिकविमा घोटाळा, हार्वेस्टर मशिन मधले कमिशन अशा अनेक गोष्टी त्यांनी उजेडात आणल्या. त्यासाठी योग्य वेळही आली.
संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी या सगळ्या गोष्टींचा काय संबंध असं कुणी विचारेल? तर साधी गोष्ट आहे. अमाप पैसा हाती असेल तर कुणालाही मारू शकतो. कशीही सिस्टीम वाकवू शकतो हा काँन्फिडंस येतो. त्या काँन्फिडंसमागे साहजिकच हे सर्व घोटाळे आणि त्यातून आलेला अमाप पैसा हे कारण आहे.
त्यामुळे सुरेश धस यांनी काढलेले घोटाळे हे योग्यच आहेत. त्यामुळे काही प्रमाणात जी दहशतीखाली लोकं होती ती बोलू लागली. नसती बोलू लागली तरी किमान दहशतीतून थोडीफार मुक्त झाली.
बीड, परभणी, पैठण आणि काल धाराशिव असे मोर्चे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून काढले गेले. यातील सुरेश धस यांचे भाषण हा मोर्चांचा केंद्रबिंदू आहे.
सुरेश धस हे एखादा मुद्दा गांभीर्याने मांडतात. त्यासाठी त्यांच्या वक्तृत्वाला तोड नाही. त्यात मध्येच ते वाहवत जात असतात. त्या वाहवत जाण्याला काही कारणंही असतात. धस यांना काही लोक ट्रोल करतात किंवा मेसेज पाठवून धमकी देत असतात. त्या धमक्यांना भिक घालत नाही हे सांगताना ते काल जरा जास्तच वाहवत गेले.
त्या वाहवत जाण्याला प्रतिसाद ही मिळतो. पण मुद्द्याचं गांभीर्य त्यामुळे कमी होऊ लागते. ते होऊ नये यासाठी सुरेश धस यांनी काळजी घेतली पाहिजे. सुरेश धसांविरूद्ध अनेकजण आवाज उठवतात पण त्यांना प्रतिसाद मिळत नाही आणि यशही येत नाही. निर्विवाद पणे सुरेश धस हा मुद्दा लावून धरत आहेत आणि त्यासाठी सर्वपक्षीय लोक त्यांचे कौतुकही करत आहेत.
ज्यावेळी माणसाला कुणी स्पर्धक नसतो. तेव्हा माणूस स्वतःच स्वतःची ‘वास्तूशांती’ करतो. स्वतः च वाटोळं करून घेत असतो. त्यामुळेच सुरेश धस अण्णा जरा दमानं चाला वाहवत नका जाऊ.