चक्क 8 तास हृदयाचं कार्य थांबवून केलं ऑपरेशन! केईएमच्या डॉक्टरांनी ‘असा’ वाचवला तरुणाचा जीव | Heart Surgery at KEM Hospital

मुंबई | मुंबईतील केईएम रुग्णालयातील हृदय शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांनी एका रूग्णाच्या हृदयाचे कार्य तब्बल 8 तास थांबवून त्यावर शस्त्रक्रिया केली. यामुळे 25 वर्षीय तरुणाचे प्राण वाचले आहेत. (Heart Surgery at KEM Hospital)

दोन आठवड्यापासून दम लागत असल्याने गोवंडीतील एक तरुण डॉक्टरांकडे गेला होता. त्यावेळी केलेल्या तपासणीत त्याला सबमायट्रल ॲन्युरिसम हा हृदयाचा दुर्मिळ आजार झाल्याचे स्पष्ट झाले. हा आजार शेवटच्या टप्प्यात असून, थोडासा विलंब झाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता होती.

गोवंडी येथे राहणारा शाफत अली मोहम्मद हनिफ दम लागत असल्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याच्या वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्याच्या हृदयामध्ये काही दोष असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याला तातडीने केईएम रुग्णालयातील हृदयरोगशास्त्र विभागामध्ये उपचारासाठी जाण्यास सांगितले. 

केईएम येथील डॉक्टरांनी त्याची अँजिओग्राफी आणि टूडी इको यासह काही चाचण्या केल्या, त्याच्या हृदयाच्या डाव्या बाजूच्या खालील कप्प्याचा थर कमकुवत होऊन तेथे फुगा (सबमायट्रल ॲन्युरिसम टाईप 3) आल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी हनिफला तातडीने हृदय शल्यचिकित्सा विभागाकडे हस्तांतरित केले.

हृदयाला आलेल्या फुग्यातील रक्त साकळल्यास हृदयात रक्ताची गुठळी तयार होऊन ती संपूर्ण शरीरात पसरल्यास लकवा होण्याचा किंवा हातापायाला गॅगरीन होण्याची शक्यता असते. हनिफच्या हृदयाच्या कप्प्याला आलेला फुगा हा शेवटच्या स्तरावर असल्याने तो कधीही फुटण्याची शक्यता होती. त्यामुळे हृदय शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. बालाजी ऐरोनी यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. 

हनिफच्या हृदयावर शस्त्रक्रिया करायची असल्याने प्रथम शस्त्रक्रिया सुरू केल्यानंतर त्याच्या हृदयाला भूल देऊन त्याचे काम थांबवण्यात आले. हृदयाचे काम थांबवताना शरीराला रक्तपुरवठा व्हावा यासाठी यांत्रिक पंपाद्वारे त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले. तब्बल 8 तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान बोवाईन पेरिकार्डियमचा वापर करून हनिफच्या हृदयाला आलेल्या फुग्याचे ताेंड आतील बाजूने बंद करण्यात आले. हृदयाला आलेला हा फुगा डाव्या कप्प्याच्या झडपेच्या खाली होता. त्यामुळे या झडपेला इजा झाली होती. या झडपेवर उपचार करण्यात आले. आता हनिफची प्रकृती स्थिर असून, त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याचे डॉ. बालाजी ऐरोनी यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया महात्मा फुले आरोग्य विमा योजनेंतर्गत करण्यात आली. त्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपये इतका खर्च आला. सबमायट्रल ॲन्युरिसम या प्रकाराचा हा आजार फारच दुर्मिळ असून, हा आजार 10 लाखांमध्ये एका व्यक्तीला होण्याची शक्यता असते. हा आजार जन्मत: किंवा जंतूसंसर्गामुळे होतो.