पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत, मात्र विद्यापीठातील कॅम्पस ड्राइव्हमधून नोकरी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अद्याप कमी आहे. यावर उपाय म्हणून कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने एक स्वतंत्र ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेल स्थापन केले आहे. याच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करणे आणि त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करणे हे उद्दिष्ट ठेवले आहे.
विद्यापीठात सामाजिकशास्त्र, संगणकशास्त्र, केमिस्ट्री, अर्थशास्त्र, कॉमर्स, मॅनेजमेंट, तंत्रज्ञान, आरोग्यशास्त्र, ललित कला, भाषा व वाड्मय अशा विविध संकुलांमध्ये १८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयांमधून ६५,००० विद्यार्थ्यांची संख्या आहे. या पार्श्वभूमीवर, अधिक रोजगार संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठाने दरवर्षी किमान दोन जॉब फेअर्स आयोजित करण्याचे ठरवले आहे.
सर्व विद्यार्थ्यांसाठी रोजगाराचे मार्ग उघडण्यासाठी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर्व विद्यापीठाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (बोट) सेंटरसोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून, फेब्रुवारी महिन्यात विद्यापीठाने मोठ्या प्रमाणावर जॉब फेअर आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या फेअरमध्ये इंजिनियरिंगसह विविध पारंपरिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पाच हजार विद्यार्थ्यांसाठी जॉब फेअर आयोजित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांमधील सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. डॉ. अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली या सेलला देखरेखीची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
पाच हजार विद्यार्थ्यांसाठी जॉब फेअर घेण्याचे नियोजन
विद्यापीठातील संकुलांसह संलग्नित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, त्यांची अपेक्षापूर्ती व्हावी, शिक्षण पूर्ण होताच त्यांना चांगला जॉब तथा रोजगार मिळावा, यासाठी विद्यापीठात ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेल सुरू केला आहे. फेब्रुवारीमध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांसाठी जॉब फेअर घेण्याचे नियोजन आहे. त्यात विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयातील सर्वच अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.
डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ