वाशिम | गेल्या वर्षी चांगला बाजारभाव मिळाल्यानं शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल वाढला होता. मात्र, यंदा सोयाबीनचा दर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरु आहेत. साडेपाच हजार रुपयांच्या आसपास स्थिर असलेल्या सोयाबीनच्या दरात आज थोडीसी सुधारणा (Soybean Price Hike) झाली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोयाबीनला ५८२५ रुपये दर मिळाला. दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून यामुळे या आठवड्यात आवकही वाढण्याची शक्यता आहे.
यंदा सोयाबीनचे उत्पादन घटले असताना मागील वर्षीच्या तुलनेत दरही कमी मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ४५०० ते ५५०० पर्यंत दर मिळत आहे. उत्पादन खर्च बघता सोयाबीनचे हे दर पुरेसे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान ६५०० रुपयांच्या वर दर मिळावा अशी अपेक्षा आहे. दर कमी असल्यानं शेतकऱ्यांनी अजून सोयाबीन विक्रीस काढलेले नाही. मागील आठवड्यात वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला ५७०० रुपये दर मिळाला होता तर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दरात १२५ रुपयांची वाढ झाली आहे. आज सोयाबीनला प्रति क्विंटल ५८२५ रुपये इतका दर मिळाला आहे. आज वाशिमच्या बाजारात ४१७६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे.
जागतिक बाजारपेठेतील स्थितीमुळे सोयाबीन दरात वाढ होणार
अर्जेंटिना मध्ये कोरडा दुष्काळ पडल्यामुळे सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात केल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सोया पेंड दरात देखील वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काळात सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
जागतिक बाजाराचा विचार केला असता आज दुपारी तीन वाजेपर्यंत सोयाबीनचा भाव १५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोहचला होता. आज जागतिक बाजारात शुक्रवारच्या तुलनेत वाढ नमूद झाली आहे. त्यामुळे कुठे ना कुठे जागतिक दरवाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारात देखील पाहायला मिळाला आहे.
वाशिम मध्ये सर्वाधिक दर
जिल्ह्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्या पेक्षा सर्वात जास्त दर मिळत आहे. शुक्रवारी रिसोड मध्ये ५४८०रु, कारंजा ५५२५ रुपये दर मिळाला होता. आज या बाजार समित्यांमध्येही १०० ते १५० रुपयांची वाढ बघायला मिळाली. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची पद्धत बदलली आहे. शेतकरी सोयाबीनला चांगला भाव मिळाला तर बाजारपेठेत विक्रीसाठी माल बाहेर काढत आहेत.
गेल्या हंगामात सोयाबीन सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या विक्रमी दरात विक्री होत होते. त्यामुळे दराची ही परिस्थिती यंदाच्या हंगामातही थोड्याफार फरकाने तशीच राहिल अशी शेतकऱ्यांना आशा होती, गेल्या काही वर्षांपासून वाढलेला उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पादन यामुळे सोयाबीन पीक तुर्तास परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या काळात दरवाढ होईल या अपेक्षेत शेतकरी वर्ग असल्याचे दिसत आहे.