नवी दिल्ली | कर्नाटकमध्ये भाजपच्या सत्तेला हादरा देत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आता राज्याला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती समोर आली आहे. तर डीके शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह महत्वाचे कॅबीनेट मंत्री पद असेल. दरम्यान मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी काँग्रेसने सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला असून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदाचा नवा फॉर्म्युला उदयास येणार आहे. India Today ने याबाबत वृत्त दिले आहे.
गेल्या चार ते पाच दिवसाच्या सस्पेन्सनंतर अखेर कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सिद्धारमैया (Karnataka CM) यांच्या गळ्यात पडली आहे. तर डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. सिद्धारमैया हे काँग्रेसचे बुजुर्ग नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पूर्वीही कारभार पाहिला आहे. तसेच प्रशासनावर त्यांची प्रचंड पकड आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. नवे मुख्यमंत्री उद्याच पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सिद्धरामैया यांच्या नावाची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात केली जाणार आहे.
सुरुवातीच्या दोन वर्षांसाठी कर्नाटक कॉंग्रेसमध्ये पक्षसंघटनेवर पकड असलेल्या आणि जनतेत लोकप्रिय असणाऱ्या सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली जाईल आणि त्यानंतर उर्वरित तीन वर्षांसाठी डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कारभार सोपवला जाईल. दोन्ही नेत्यांना खूश करत पक्षांतर्गत संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेसने या फॉर्म्युल्याचा अवलंब करण्याचं निश्चित केल्याची सूत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या हे उद्या 18 मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे.
सिद्धरामय्या यांनी काल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. तसेच शिवकुमार यांनीही खरगेंना भेटून मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला होता. खरगे यांच्या भेटीत दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आपणच कसे योग्य आहोत आणि आपल्या नेतृत्वात राज्यात काँग्रेस कशी बळकट होणार आहे, हे ठासून सांगितले होते.
दरम्यान पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीनंतर आज सिद्दरामय्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी काही वेळापूर्वी रवाना झालेत. तर सिद्दरामय्या यांची राहुल गांधींसोबत चर्चा झाल्यानंतर शिवकुमारही राहुल गांधींना भेटणार आहेत. त्यानंतरच मुख्यमंत्रिपदाबाबतच्या नव्या फॉर्म्युल्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
एकीकडे या सर्व घडामोडी सुरू असताना काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत आमदारांचा कल जाणून घेतला जाणार आहे.
डी के शिवकुमार यांच्या एका वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण
सिद्धरामय्या यांनी याआधी कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद भुषवले आहे. त्यामुळे यंदा मला संधी देण्यात यावी, अन्यथा मी केवळ एक सामान्य आमदार म्हणून काम करेन, असे डी के शिवकुमार म्हणालेत. डी के शिवकुमार यांच्या या वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण असल्याचे बोलले जात आहे. डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात असल्याने पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे काँग्रेस नेत्यांसह कर्नाटकच्या जनतेचं लक्ष लागले होते.