श्री ज्योतिबाचे दर्शन पूर्ववत सुरू राहणार; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय | Shree Jyotiba Darshan
कोल्हापूर | श्रावण षष्ठी यात्रेमुळे श्री ज्योतिबा मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांसाठी दर्शन (Shree Jyotiba Darshan) नियमित सुरु राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली आहे.
श्री. केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरी येथील श्री. केदारलिंग देवाच्या (जोतिबा) मूर्तीच्या संवर्धनाचे काम सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग पुणे यांच्यामार्फत दि. 7 ते दि. 11 जुलै 2024 दरम्यान करण्यात येणार होते.
दरम्यान 6 जुलै रोजी वाडी रत्नागिरी येथे देवाच्या सर्व पुजाऱ्यांनी बैठक झाली. जोतिबाची श्रावण षष्ठी यात्रा दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. या यात्रेसाठी पुजारी वर्गाला, आधीपासून तयारी करावी लागते. याचा विचार करुन जोतिबा मुर्तीच्या संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात यावे, अशी विनंती प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदन देवून केली.
पुजारी वर्गाच्या निवेदनाचा विचार करुन श्री. जोतिबाच्या मुर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे जोतिबा देवाचे दर्शन नियमित सुरु राहील, असे देवस्थान व्यवस्थापन समितीकडून कळवण्यात आले आहे.