Shivsena MLA Disqualification Case | आमदार अपात्रतेबाबत हालचालींना वेग! राहुल नार्वेकर पुन्हा दिल्लीला रवाना

0
200

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला वेग आला आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. अशात विधानसभा अध्यक्ष प्रकरण निकाली लावण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारल्याने त्यांनी सुनावणी पूर्ण करण्यावर लक्ष दिल्याचे दिसत आहे.

Shivsena MLA Disqualification Case

सर्वोच्च न्यायालयाने राहूल नार्वेकरांना फटकारण्यासोबतच 30 ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. 17 ऑक्टोबरला आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत कडक शब्दात फटकारलं होतं. तसेच दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी बसून विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचं वेळापत्रक ठरवावं, अशा सूचना न्यायालयाने केल्या होत्या.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राजधानी दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत. दिल्ली दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ‘मी दिल्लीला चाललो आहे. हा दौरा पूर्वनियोजित आहे. त्यासाठी मी चाललो आहे. महाधिवक्त्यांचीही मी भेट घेणार आहे. कायदेशीर सल्ला घेऊन मी पुढील निर्णय घेईल, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार अपात्रतेची याचिका दाखल झाल्यानंतर ही नोटीस जाणं हा प्रक्रियेचा भाग आहे, असं नार्वेकर यांनी सांगितले. एकूणच आता राहूल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान ठेवत उद्या वेळापत्रक सादर करणारं का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.