‘शिवसेना’ पक्ष उद्धव ठाकरे यांना मिळणार! ‘या’ वकीलांच्या दाव्याने राजकारणात खळबळ | ShivSena
मुंबई | शिवसेना (ShivSena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज सुरु होणार होती. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) केली होती, परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही.
सदर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अजित पवार गटाने कालावधी वाढवून मागितला असून सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाची विनंती मान्य करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, ” येत्या 14 ऑगस्टला सुप्रीम कोर्ट थेट निकाल देण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी पक्षाचा निकाल लागेल. शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळेल. तर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल”, असा दावा असीम सरोदे यांनी केला आहे.
सरोदे पुढे म्हणाले की, ”विधानसभा निवडणुकीच्या आधी सुप्रीम कोर्टाला तो निकाल द्यावा लागेल. अन्यथा सुप्रीम कोर्टाची नाचक्की होईल. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण जाणूनबुजून लांबणीवर टाकलं जातंय का? हा प्रश्न उपस्थित होईल”, असे असीम सरोदे म्हणाले.