शिवाजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित | Shivaji University
कोल्हापूर | जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणचे मार्ग देखील यामुळं बंद करण्यात आलेत. त्यामुळं शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
सध्या शिवाजी विद्यापिठात (Shivaji University) मार्च – एप्रिल 2024 सत्रातील विविध अभ्याक्रमांच्या परिक्षा सुरू आहेत. दरम्यान पावसाची संततधार आणि काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळं विद्यापीठ प्रशासनानं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून 22 जुलै 2024 रोजी होणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत.
पाऊस व अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यास अडचणी उद्भवू शकतात हे जाणून विद्यापीठ प्रशासनानं, सोमवारी 22 जुलै रोजी होणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव निवास माने यांनी दिली आहे.
विविध भागात गेले काही दिवस पावसाची संततधार सुरू आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ठिकठिकाणचे वाहतूक मार्ग यामुळं बंद झाले आहेत. दरम्यान जोरदार पाऊस होत असल्यामुळं सोमवारी होणारी परीक्षा स्थगित करावी अशी मागणी युवासेना शहरप्रमुख अॅड. मंदार पाटील यांनी विद्यापीठ प्रशासनाकडं केली होती.