लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीतच, मग खरी वाघनखं आहेत कुठं? वाचा… Shivaji Maharaj Waghnakh
कोल्हापूर | लंडनहून आणली जाणारी वाघनखं (Wagh Nakh) ही शिवरायांची (Chhatrapati Shivaji Maharaj) नाहीत असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनेही देखील सावंत यांच्या दाव्याला पुष्टी दिल्याने या प्रकरणात खळबळ उडाली आहे.
म्युझियमने सावंत यांना पत्र पाठवून स्पष्ट केले आहे की, या वाघनखांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणताही संबंध असल्याचा पुरावा उपलब्ध नाही. यावरून सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Shivaji Maharaj Waghnakh: सरकारवर फसवणूक आणि अपमानाचा आरोप
सावंत यांच्या मते, महाराष्ट्र सरकार खोटा दावा करत आहे आणि शिवाजी महाराजांचा आणि तमाम शिवभक्तांचा अपमान करत आहे. सरकारने 30 कोटी रुपये खर्च करून तीन वर्षांसाठी या वाघनखांचे प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरवले आहे आणि यासाठी आठ कोटी रुपयांच्या खर्चात नवीन संग्रहालय देखील बांधले जात आहे.
या खर्चावर आणि टेंडर प्रक्रियेवरही सावंत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. \”ही महाराष्ट्राची फसवणूक आहे आणि शिवाजी महाराजांचा अपमान आहे,\” असे सावंत यांनी आरोप केले आहेत.
शिवरायांची खरी वाघनखं कुठं आहेत?
जर ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांची नसतील, तर महाराजांनी वापरलेली वाघनखं गेली कुठे? असा सवाल उपस्थित होतो. दरम्यान खरी वाघ नखं ही साताऱ्यातून बाहेर गेल्याची किंवा कोणाला भेट दिल्याचा कोणताही पुरावा नाही. महाराजांची वाघनखं ही साताऱ्यातील जलमंदिरातच आहेत. असे अनेक सबळ पुरावे 1919 पर्यंत उपलब्ध आहेत. याबाबतची अधिक माहिती उदयनराजे महाराज स्वतः देऊ शकतील. त्यांनी याबाबत पुढे येऊन बोलावं असं आवाहन इंद्रजीत सावंत यांनी यावेळी केलं.
\’शोध भवानी तलवारीचा\’ या पुस्तकात वाघनखं : एक अभ्यास या लेखात इंद्रजीत सावंत यांनी लिहिलं आहे की, ग्रॅट डफ आणि एल्फिन्स्टनना भेट दिलेली वाघनखं सोडून शिवाजी महाराजांची म्हणून ओळखली जाणारी आणखी दोन वाघनखं इ. स. 1919 पर्यंत तरी सातारकर छत्रपतींच्या राजवाड्यात पाहावयास मिळत होती. डफने त्याचा मार्गदर्शक माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचेच नाव आपल्या मुलाला ठेवले होते. इ.स. 1874 मध्ये हा डफचा मुलगा भारत भेटीवर आला होता, त्यावेळी त्याने सातारा येथील राजवाड्याला भेट दिली होती. त्यावेळी या ठिकाणी दोन वाघनखंही पाहिली होती, त्याचे वर्णन त्याने आपल्या \’नोट्स ऑफ इंडियन जर्नीं\’ या पुस्तकात लिहून ठेवले आहे.
शेवटचा सबळ पुरावा सातरच्या छत्रपती घराण्यातच
ग्रँट डफला छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी वाघनखं भेट दिल्यानंतर जवळपास 40 ते 45 वर्षांनी म्हणजेच 1907 रोजी मॉर्डन रिव्ह्यू या मासिकात साताऱ्यातील छत्रपती घराण्यातून एक फोटो प्रकाशित झाला होता. त्या फोटोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि दोन वाघनखं ठेवण्यात आली होती. असा फोटो प्रकाशित झाला होता. 1919 पर्यंत ही वाघनखं साताऱ्यातील जलमंदिरच्या भवानी मंदिरात असल्याच्या नोंदी आढळतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची खरी वाघनखं ही साताऱ्याच्या छत्रपती घराण्याकडेच आहेत, असे स्पष्ट होते.