पप्पा म्हणाले, चपाती गोल नसली तरी चालेल मग काय बहाद्दूर बेटीनं उभी केली तब्बल 500 कोटींची कंपनी

मुंबई | प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात. हेच आपल्या कतृत्वाच्या जोरावर विनिता सिंह यांनी जगाला दाखवून दिलय. ऐन तिशीत या तरूणीनं तब्बल 500 कोटींचा बिझनेस सेटअप उभा करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिलाय. यामुळे या तरुणीचं जगभरात सर्वत्र भरभरून कौतुक केल जात आहे.

शुगर कॉस्मेटिक्सच्या संस्थापक आणि शार्क टँक इंडियाच्या जज विनिता सिंह यांनी देशातच नाही तर जगभरात आपल्य़ा कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आज त्यांना शार्क टँक इंडियामुळे वेगळी ओळख मिळाली असली तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना दोनदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

व्यवसायाच्या सुरवातीलाच अपयशाचा सामना करावा लागूनही विनिता सिंह यांनी हार मानली नाही. विनिता यांचे आई-वडील मेडिकल बॅकग्राऊंडचे होते. त्यामुळे मुलीनेही या क्षेत्रात काहीतरी करावे, अशी त्यांची इच्छा होती. आयआयटीमधून अभियांत्रिकी केल्यानंतर त्यांनी आयआयएममधून एमबीए केले आणि स्वत:ला व्यवसायासाठी तयार केलं. व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतलेल्या विनिता सिंह यांनी आपल्या व्यवसायाच्या आवडीपुढे एक कोटीच्या नोकरीचे पॅकेज देखील नाकारलं आहे.

आयआयएममधून एमबीए केल्यानंतर विनिता सिंह यांना एक कोटीच्या पॅकेजची ऑफर मिळाली होती. पण त्यांनी दोन मित्रांसोबत आपला बिझनेस सेटअप सुरू केला. मात्र व्यवसायात गुंतवणूकदार नसल्यामुळे त्यांना हा सेटअप थांबवावा लागला. यानंतर त्यांनी सेवा पुरवठादारावर आधारित दुसरा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात देखील नुकसान झाल्याने त्यांना इथेही अपयशाचा सामना करावा लागला.

सुरूवातीलाच दोन व्यवसायात अपयश आलेल्या विनिता यांनी अपयश हीच यशाची पहिली पायरी समजून पून्हा नव्या उमेदीने 2015 साली मित्र कौशिक मुखर्जी यांच्यासोबत ‘शुगर कॉस्मेटिक्स’ ब्रॅंडची सुरूवात केली. केवळ 4 लिपस्टिक शेड्सपासून सुरू झालेला त्यांचा हा व्यावसायिक प्रवास आज एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. ज्याकाळात देशात फॅशनची फारशी क्रेझ नव्हती. अशा परिस्थितीत फॅशन ब्रँड सुरू करणे खूप आव्हानात्मक होतं. हे आव्हान स्विकारत विनिता यांनी शुगर कॉस्मेटिक ब्रॅंड यशस्वी करून दाखवला.

विनिता सिंह यांनी आपल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले की त्यांचे वडील त्यांना स्वयंपाकघरात जाण्यापासून थांबवायचे. स्वयंपाक करत बसलात तर आयुष्यभर तेच करत रहाल. चपाती गोल झाली नाही तरी चालेल पण जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल, आयुष्यभर काळजी करावी लागणार नाही असा सल्ला दिला.

आज शुगर कॉस्मेटिक्सच्या लिपस्टिकच्या चारही शेड्स ग्लोबल ब्रँड बनल्या आहेत. आज त्यांची 130 शहरांमध्ये 2500 हून अधिक आउटलेट आहेत. त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल तब्बल 500 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळेच विनिता सिंह यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.