पुणे | अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली आहे.
अपडेट –
– जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी पक्षाच्या प्रतोदपदी निवड, विरोधी पक्षनेतेपदी निवडीची शक्यता
– मी साहेबांसोबत – जयंत पाटील यांची ट्विट करून माहिती
– पक्ष विरोधी भुमिका घेणाऱ्यांवर कारवाई करणार – शरद पवार
या फुटीचे श्रेय पंतप्रधान नरेंद मोदी यांना जात असल्याचे मत शरद पवार (#SharadPawar) यांनी व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचारी पक्ष म्हणून जोरदार आरोप केले होते. राष्ट्रवादीतील काही नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे. त्याच्या धसक्यानेच आमच्या पक्षातील काहीजण अस्वस्थ होते. आजची घटना त्यामुळेच घडल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले शरद पवार? #SharadPawar
आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्या विरोधात भूमिका घेतली. उद्या 6 तारखेला मी महाराष्ट्राच्या पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केले गेले होते. संघटनात्मक बदल संबंधिचे प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्याचा विचार मी करत होतो. पण प्रश्न उपस्थित केले गेले होते त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली. ती भूमिका घेऊन आम्हीच पक्ष आहोत, अशाप्रकारची भूमिका त्यांनी मांडली.
माझं स्वच्छ मत असं आहे की, पक्षातील विधीमंडळाचे काही सदस्य यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली या संबंधिचं चित्र आणखी दोन-तीन दिवसात लोकांसमोर येईल. याचं कारण ज्यांची नावं आली त्यातील काही लोकांनी माझ्याशी आजच संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे, याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. पण याबाबतीत मी आताच काही बोलू इच्छित नाही. कारण याचं स्वच्छ चित्र माझ्या इतकंच त्यांनी जनतेच्या समोर मांडण्याची गरज आहे. ते त्यांनी मांडलं तर त्याबाबत वाद नसेल. मांडलं नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेन
आता प्रश्न राहिला, पक्षाच्या भवितव्याबाबतचा. हा आजचा प्रकार इतरांना नवीन असेल, मला हा नवीन नाही. मला आठवतंय की १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचं नेतृ्त्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर त्या ५८ पैकी ६ सोडले सगळे माझा पक्ष सोडून गेलो. मी ५८ जणांचा विरोधी पक्षनेता होतो. पण त्यानंतर मी पाचच लोकांचा नेता राहिलो. मी ५ लोकांना घेऊन पक्ष बांधायला मी महाराष्ट्रात निघालो. त्यानंतर पाच वर्षांनी निवडणूक झाली त्यात दिसलं की आमची संख्या ६९ वर गेली. म्हणजे संख्या वाढली.
शरद पवार यांची कबुली, अजित पवारांनी पक्ष फोडला
आधीही अनेक आमदार पक्ष सोडून गेले होते. नेत्यांना भ्र्ष्टाचारी आरोपातून मुक्त केले याबद्दल आभार. अजित पवार यांनी पक्ष फोडला. अजित पवार यांनी राजीनामा दिला याची मला माहिती नव्हती. कुणी काहीही दावा केला असला तरी आम्ही लोकांमध्ये जाऊन आमची भूमिका मांडू. उद्या कराडला प्रीतीसंगम येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे.
पूर्ण महाराष्ट्रात फिरून अस्वस्थता दूर करणार – शरद पवार
विरोधी पक्षनेते कोण असावेत हा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेत असतात. याचा संख्या बळाच्या आधारावर हा निर्णय असतो. त्यामुळे विरोधी पक्षनेता काँग्रेसचा असू शकतो, किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा किंवा राष्ट्रवादीसोबत असलेला कुणीही होऊ शकतो. हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून ठरवू. त्याचबरोबर ज्यांच्या विरोधात संघर्षाची भूमिका घेतली त्यांच्यासोबत काहीजण गेले त्यामुळे अस्वस्थता पसरणार हे नक्की आहे. पण, पूर्ण महाराष्ट्रात फिरून ही अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांच आवाहन
माझा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांवर प्रखर विश्वास आहे. आमची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते सगळे अस्वस्थ झाले असतील हे खरं आहे. कारण जे कष्ट करतात, आम्हाला लोकांना निवडून देतात, आम्ही सांगतो ती भूमिका मांडतात आणि काही लोक विरोधी संघर्षाची भूमिका घेतात, ज्यांची संघर्षाची आणि विरोधाची भूमिका घेतली आज त्यांच्यामध्येच आम्ही सहभागी झालो तर कार्यकर्ते अस्वस्थ होणार. यामध्ये त्यांचा दोष नाही. पण त्यांची अस्वस्थता काढायची असेल तर पुन्हा संघटनेची बांधणी करायचं काम करावं लागेल. हे काम मी आणि संघटनेचे असंख्य तरुण माझ्याबरोबर करतील याची मला पूर्ण खात्री आहे.