बुलढाणा | समृद्धी महामार्गावर आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात झाला असून समृद्धी महामार्ग मृत्युचा महामार्ग असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सिंदखेडराजा नजीक ट्रॅव्हल्स पलटी होऊन जळाली असून या अपघातात तब्बल 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg Accident) अपघातांचे सत्र अद्याप सुरूच असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात आहे.
महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वात भयंकर अपघात सिंदखेडराजानजीक घडला आहे. एक खाजगी ट्रॅव्हल्स पटली होऊन तिने जागीच पेट घेतला. या अपघातात बसमध्ये झोपलेल्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. (Buldhana Samruddhi Mahamarg Accident)
या अपघातात ट्रॅव्हल्स बस दुभाजकाला धडकली त्यानंतर पलटी होऊन ट्रॅव्हलने पेट घेतला. तब्बल एक ते दीड तास चाललेल्या या अग्नीतांडवात 25 जणांनी जीव गमावला आहे. रात्रीची वेळ असल्याने त्यांना वाचवायला त्यांच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही. ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये बसलेले काही प्रवासी काचा फोडून बाहेर पडल्याने यातून बचावल्याचे समजते. या बसमध्ये ३२ प्रवासी बसले होते.
विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. 30 जूनला नागपूरहून संध्याकाळी 5 वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. 1 जुलै च्या रात्री 1.22. मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला.