बीडच्या सरपंच हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची अफवा; पोलिसांनी केला महत्वाचा खुलासा | Santosh Deshmukh

बीड | मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) नाशिकमध्ये असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. नाशिकरोड येथील मुक्तिधाम परिसरात तो फिरत असल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली.

पोलिसांनी तात्काळ याबाबत तपास केला. मुक्तिधाम परिसरात सर्च ऑपरेशन राबवत सीसीटीव्ही फुटेज आणि लॉजिंग रेकॉर्ड तपासण्यात आले. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केले की, तपासादरम्यान कृष्णा आंधळेशी साधर्म्य असलेला कोणताही व्यक्ती आढळला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील व्हिडिओ अफवा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांचा तपास सुरूच
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिस त्याचा शोध घेत असून या प्रकरणी पोलीस यंत्रणा अधिक सतर्क आहे.

वाल्मिक कराड पोलीस कोठडीत
दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपी वाल्मिक कराडला कोर्टाने 22 जानेवारी 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यातील संभाषणाचा तपास करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप
सरपंच हत्या प्रकरणावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी 15-16 डिसेंबर 2024 रोजी दिंडोरीतील एका आश्रमात मुक्काम केल्याचा दावा त्यांनी केला. या आश्रमाचे प्रमुख श्रीराम खंडेराव मोरे (गुरू माऊली) यांच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असल्याचे त्यांनी म्हटले. या मठाविरोधात 2023 मध्ये काही तक्रारी होत्या. त्या मिटवण्यासाठी वाल्मिक कराडने मध्यस्थी केली होती, असा दावाही देसाई यांनी केला.

‘सरकार आरोपींना वाचवत आहे का?’
देसाई यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोप केले. “वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यासोबतच अण्णासाहेब मोरे यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.