News

मोठं होऊन काय बनायचंय? Santosh Deshmukh यांच्या दोन्ही मुलांनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

जालना | संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या (Santosh Deshmukh murder case) प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने होत आहेत. देशमुख कुटुंबीयांसह असंख्य नागरिक या आंदोलनांमध्ये सहभागी होत आहेत. आज जालन्यात या प्रकरणाच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चादरम्यान संतोष देशमुख यांच्या मुलांनी पहिल्यांदाच त्यांच्या भविष्याविषयी बोलताना आपली स्वप्ने उघड केली. देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) म्हणाली, “मला डॉक्टर व्हायचं असून ते माझं स्वप्न आहे. अभ्यासाचा विचार करता माझं एक वर्ष बॅक लॉग झालं आहे, पण ते मी पुढच्या वर्षी पूर्ण करू शकते. मात्र, माझ्या वडिलांचे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचं नाही.”

संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख (Viraj Deshmukh) यावेळी म्हणाला म्हणाला, “मला इंजिनियर व्हायचं आहे.” देशमुखांच्या दोन्ही मुलांनी त्यांची मोठं होऊन काय बनायच आहे याची स्वप्न ऐकून मोर्चातील उपस्थितांना गहिवरून आलं होतं. तर उपस्थितांनी तुमची स्वप्न नक्कीच पूर्ण होतील अशा भावना व्यक्त करत दोन्ही मुलांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध समित्या नेमल्या असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले असून न्यायासाठी होत असलेल्या या आंदोलनांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

Back to top button