News

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणात पुन्हा एल्गार? मस्साजोगमध्ये हालचाली वाढल्या, आज दुपारी मोठा निर्णय..

Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खून प्रकरणाला 33 दिवस झाले असून, ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना मकको लावण्यात आला आहे. तर कृष्णा आंधळे हा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. या आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वी जलसमाधी आंदोलन केले होते. मात्र पोलीस अधीक्षक नवनीत कांवल यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आज दुपारी मस्साजोगमध्ये Santosh Deshmukh Case बद्दल महत्त्वाची बैठक

ग्रामस्थांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज दुपारी 12 वाजता मस्साजोग येथे बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाचे नियोजन आणि सरकारवर दबाव टाकण्यासाठीच्या उपाययोजना ठरवण्यात येणार आहेत. याप्रकरणी ग्रामस्थांमध्ये सरकार आणि यंत्रणांविरोधात तीव्र असंतोष आहे.

वाल्मिक कराड याला संरक्षण का?

या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अभय मिळत असल्याचा आरोप होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल गंभीर आरोप करताना म्हटले की, वाल्मिक कराड याला सरकारचा जावई असल्याप्रमाणे वागणूक दिली जात आहे. त्याला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा पाठिंबा असल्याचेही दमानिया यांनी सांगितले. त्याच्यावर धनंजय मुंडे आणि काही प्रमाणात पंकजा मुंडे यांचा वरदहस्त जोपर्यंत आहे, तोपर्यंत वाल्मिकवर मकोका लावण्यात येणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. या आरोपांमुळे पोलिस तपास आणि प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

ग्रामस्थांच्या भावना तीव्र

सरकारकडून योग्य तोडगा निघत नसल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता आहे. वाल्मिक कराडला अभय मिळत असल्याची भावना तीव्र होत असल्याने आता बैठकीत काय दिशा ठरेल हे पाहणे गरजेचे आहे.आजच्या बैठकीत ग्रामस्थ आंदोलनाचा पुढील मार्ग ठरवतील. पोलिस आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले जाईल, अशी शक्यता आहे.

आजची बैठक या प्रकरणातील महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी ठरण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांचा आक्रोश आणि आरोपांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास आणि आरोपींवर कशी कारवाई केली जाते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Back to top button