News

संतोष देशमुखांच्या आरोपींची कोल्हापुरपर्यंत दहशत; ‘हे’ आहे कनेक्शन | Santosh Deshmukh

कोल्हापूर | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे अनेक किस्से उघडकीस येत आहेत. अशाच एका मोठ्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडवली आहे. बीडमधील ऊस तोड मुकादमांनी कोल्हापूरमधील शेतकऱ्यांची दोन वर्षांत तब्बल ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं बीडची दहशत आता कोल्हापूरपर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे.

४४५ गुन्ह्यांची नोंद; कोल्हापूर पोलिसांसमोर आव्हान

फसवणुकीच्या या प्रकरणात कोल्हापूरमधील ३१ पोलीस ठाण्यांत ४४५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ऊस तोड मजूर पुरवण्यासाठी आगाऊ पैसे घेतले जातात, मात्र प्रत्यक्षात मजूर न पाठवता पैसे हडप केले जात आहेत. पैसे मागणाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे आणि गंभीर मारहाणीचे प्रकारही उघड झाले आहेत.

ऊस हंगामात बीडच्या मुकादमांची दहशत

कोल्हापूरमधील ऊस हंगामासाठी बीड आणि परळी भागातील मजूर मोठ्या प्रमाणावर येतात. हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी मजुरीचे कोट्यवधी रुपये आगाऊ देतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत मजूर न पुरवण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पैसे मागितल्यास धमक्या देण्याचा प्रकार अनेकदा घडला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संबंध

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासादरम्यान, बीडमधील मुकादम आणि त्यांच्या फसवणुकीचे कनेक्शन उघड झाले आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी या प्रकरणावर कठोर भूमिका घेत, मुकादमांविरोधात फौजदारी स्वरूपात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांची मागणी: कठोर कारवाईची गरज

बीड मधील मुकादमांकडून फसवणूक झालेले शेतकरी फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरतेच मर्यादित नसून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळं फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी मुकादमांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Back to top button