आता संपूर्ण देशात सोनं खरेदीसाठी एकच भाव; लवकरच होणार मोठा बदल! Gold Rate
भारतात, सोने हे पारंपारिक गुंतवणुकीचे साधन आहे. महागाई आणि आर्थिक अस्थिरतेपासून बचाव करण्यासाठी लोकांनी अनेक पिढ्यांपासून सोन्यात गुंतवणूक केली आहे. सोन्याची किंमत वेळेनुसार वाढण्याची शक्यता असल्यामुळे ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले मानले जाते.
तसेच भारतात सोने हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. लग्न आणि इतर शुभ प्रसंगी सोन्याचे दागिने देणे आणि घेणे ही एक सामान्य प्रथा आहे. अनेक हिंदू देवदेवतांना सोन्याने सजवले जाते आणि पूजेत देखील सोन्याचा वापर केला जातो. त्यामुळे जगाच्या तुलनेत भारतात सोने खरेदीकडे लोकांचा विशेष कल असल्याचे दिसून येते.
असे असले तरी आपल्या देशात वेगवेगळ्या शहरात सोन्याचा दर वेगवेगळा आकारला जातो. सोन्याबरोबरच चांदीचा दरही प्रत्येक राज्यात आणि शहरात वेगळा असल्याचे दिसते. या मौल्यवान धातूंवर आकारला जाणारा कर वेगवेगळा ठिकाणी वेगवेगळा असतो. मात्र आता लवकरच देशातील सर्व राज्यांमध्ये तसेच शहरांमध्ये सोने, चांदीचा दर एकच असल्याचे पहायला मिळणार आहे.
सोने-चांदीच्या दराच्या बाबतीत वन नेशन वन रेट ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. हे धोरण लागू झाल्यानंतर देशात कोणत्याही भागात सोन्याचा दर एकच असेल. या धोरणामुळे सोन्याचे व्यापारी, ज्वेलर्स यांना देखील फायदा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे धोरण लागू करण्यासाठी देशातील अनेक ज्वेलर्सनेही सहमती दर्शवली आहे.
जेम अँड ज्वेलरी काऊन्सिलचा पाठिंबा
सोन्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशात \’वन नेशन, वन रेट\’ (One Nation One Rate) धोरण लागू करण्यास जेम अँड ज्वेलरी काऊन्सीलने (GJC) समर्थन दिले आहे. या धोरणाच्या मदतीने देशात प्रत्येक भागात सोन्याचा दर एकच असेल. वेगवेगळ्या माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार सप्टेंबर 2024 मध्ये या धोरणाबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. या धोरणाचे काही फायदे असले तरीही ते लागू झाल्यानंतर वेगळी आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे. या आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासून केली जात आहे.
वन नेशन, वन रेट (Gold Rate) पॉलिसीने नेमकं काय होणार?
केंद्र सरकारतर्फे वन नेशन वन रेट हे धोरण राबवण्यावर विचार केला जात आहे. संपूर्ण देशात सोन्याचा दर एकच असावा, असे केंद्र सरकारचे मत आहे. हे धोरण लागू झाल्यानंतर तुम्ही दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकता अशा कोणत्याही मेट्रो शहरात किंवा एखाद्या छोट्या शहरात देखील सोने खरेदीसाठी एकच किंमत द्यावी लागेल.
या धोरणाअंतर्गत केंद्र सरकार नॅशनल बुलियन एक्स्चेंज (National Bullion Exchange) तयार करणार आहे. या आस्थापनेच्या माध्यमातून सोन्याचा एकच दर निश्चित केला जाईल. या आस्थापनेने सोन्याचा दर निश्चित केल्यानंतर ज्वेलर्सना त्याच दरानुसार सोने विकावे लागेल.
वन नेशन, वन रेटचा सामान्यांना काय फायदा?
देशात वन नेशन, वन रेट लागू झाल्यानंतर पारदर्शकता येईल, असा दावा केला जात आहे. सध्या देशात सोन्याचा दर सगळीकडे वेगवेगळा असतो. त्यामुळे हा दर कुठे कमी असतो तर कुठे जास्त असतो. अनेक ठिकाणी ज्वेलर्स मनमानी पद्धतीने सोन्याचा दर लागू करतात. मात्र वन नेशन लागू झाल्यानंतर यावर लगाम बसू शकतो.