News

धनंजय मुंडे काल CM ना भेटतात अन् आज…”, वाल्मिक कराड शरण आल्यानंतर संभाजीराजेंचे खळबळजनक वक्तव्य | Sambhajiraje Chhatrapati

Walmik Karad | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर तब्बल तीन आठवड्यानंतर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला सीआयडीने ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वीच सीआयडीने वाल्मिक कराडला अटक केल्याची बातमी समोर आली होती. परंतु आज (Walmik Karad arrested) वाल्मिक कराड पुणे सीआयडीला सिनेमा स्टाईल पध्दतीने शरण आल्याचे चित्र सर्वांना पहायला मिळाले.

आत्मसमर्पण करण्यापूर्वी वाल्मिक कराडने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने आपण सीआयडीसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पुढच्या काही वेळातच त्याने सीआयडी मुख्यालय गाठत आत्मसमर्पण केले. आता सीआयडीकडून त्याची चौकशी सुरु आहे.

वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणानंतर, संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. काल धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज तो सीआयडीसमोर हजर होतो. यामागे काही दडलंय का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. धनंजय मुंडेंचे मंत्रिपद काढून घ्यावे, त्यांना पालकमंत्री करू नये अशी मागणीही त्यांनी या पत्रकार परिषदेत केली आहे.

वाल्मिक कराड शरण आला हे सीआयडीचं यश नाही. त्याच्यावर थोडाफार मानसिक दबाव आला असेल म्हणून तो कदाचित शरण आला असेल. 22 दिवस तो हाती लागत नाही. काल धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज तो हजर होतो. याच्या मागे काही दडलंय का?, अशी शंका संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.

वाल्मिक कराडवर 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सात आरोपींचा म्होरक्या आहे. त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा नोंद करून चालणार नाही. त्याच्यावर मोक्का लागला पाहिजे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं होतं तो शब्द पाळावा. धनंजय मुंडेंचे मंत्रिपद काढून घ्यावे. त्यांना पालकमंत्री करू नये, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

दरम्यान या प्रकरणावरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र पोलीस खात्यावर टीका केली आहे. ‘एक्स’च्या माध्यमातून त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. तसेच, सरेंडर होण्यापूर्वी वाल्मिक कराड व्हिडीओ बनवतो आणि स्वत:ला क्लीन चिट देतो म्हणजे त्याच्यामागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे, असे म्हणत सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Back to top button