छ. संभाजीनगर | महानगरपालिकेतील अनुकंपा तत्त्वावरील ६४ उमेदवारांच्या नियुक्तीनंतर आता ११५ रिक्त पदांवर महिना अखेरीस भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून रोस्टर निश्चित करुन बिंदूनामावली ठरवण्यात आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली जात आहे. रिक्त पदांवरील नोकरभरतीसाठी खासगी एजन्सीची मदत घेतली जाणार आहे.
वर्ग तीनच्या पदांचे रोस्टर मंजूर करून बिंदूनामावली निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. विभागीय आयुक्त कार्यालयाने ही प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे ११५ पदांसाठी नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या पदांवरील नोकरभरतीबद्दलची फाइल आस्थापना विभागाने प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठवली आहे. प्रशासकांची मंजूरी मिळताच जाहिरात प्रसिद्ध करून नोकरभरतीची प्रक्रिया महिनाअखेर सुरू केली जाणार आहे.
खासगी एजन्सीच्या माध्यमातून नोकरभरती करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. यासाठी तीन एजन्सींची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सींनी अद्याप काम सुरू केले नाही, त्यामुळे प्रशासक स्वत: एजन्सीच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.