News

समरजित घाटगे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या \’तुतारी\’ चिन्हावर विधानसभा लढणार? मुश्रीफांची डोकेदुखी नक्कीच वाढणार! Kagal Vidhansabha 2024

कोल्हापूर | कागल मतदारसंघात विधानसभा (Kagal Vidhansabha 2024) निवडणूकीला मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. हसन मुश्रीफांना आस्मान दाखवण्यासाठी समरजीत घाटगे यांनाच तुतारीच्या चिन्हावर रिंगणात उतरवण्याची तयारी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) सुरु केल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच सर्व राजकीय पक्षांकडून मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. पक्षफुटीनंतर साथ सोडलेल्या आमदारांना आव्हान देण्यासाठी शरद पवार नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातून देखील विद्यमान आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शरद पवारांकडून भाजप नेते समरजीतसिंह घाटगे यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मुश्रीफांसोबतच भाजपचीही डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात आहे.

हसन मुश्रीफांच्या विजयाचा वारू रोखण्यासाठी आणि पक्ष फुटीत साथ सोडल्यामुळे शरद पवारांनी हा डाव टाकल्याचे बोलले जात आहे. यासाठीच समरजीत घाटगे यांना ऑफर देण्यात आली असून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते समरजित घाटगे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. जर समरजीत घाटगेंनी तुतारी चिन्हावर उभे राहण्याचा निर्णय घेतला तर ही निवडणूक हसन मुश्रीफांसाठी कधी नव्हे इतकी अवघड जाणार असल्याचे बोलले जात आहे.

समरजीत घाटगेंचे स्पष्टीकरण

या पार्श्वभूमीवर समरजीत घाटगे यांनी सांगितले की, तुतारी चिन्हावर कागल विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवण्याचा हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये तशी चर्चा सुरू आहे. मात्र मी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. उमेदवारी बाबतच्या सगळ्या चर्चा मी देखील माध्यमांवरच बघत आहे, अशी प्रतिक्रिया घाटगे यांनी दिली आहे. 

काय म्हणाले हसन मुश्रीफ? 

समरजीत घाटगे शरद पवार गटातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांनी म्हटले की, कागलमध्ये कोण जिंकणार, हे जनताच ठरवेल. अजित पवार गट आणि घड्याळ चिन्हावर माझा प्रचार सुरू झाला आहे. माझ्यासमोर कोण उभे राहणार, याची मला चिंता नाही. तिरंगी-चौरंगी कशीही लढत होऊ दे, मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात असणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

संजय घाटगे यांना पैसे देऊन मुश्रीफच रिंगणात उतरवतात?

दरम्यान, कागल विधानसभेची लढाई सोपी करण्यासाठी हसन मुश्रीफ संजय घाटगे यांना रिंगणात उतरायला सांगतात, त्यासाठी ते घाटगे यांना पैसे देतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर देखील हसन मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, आईशपथ घेऊन सांगतो मी कधीही संजयबाबा घाटगे यांना विधानसभेला उभा राहण्यासाठी पैसे दिले नाहीत. निवडणूक तिरंगी करण्यासाठी मी संजयबाबा यांना पैसे दिल्याचा आरोप विरोधकांनी केला. पण यात तथ्य नाही, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 

Back to top button