आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया: तुमच्या मुलाचा प्रवेश निश्चित झाला का? या लिंकवरून तपासा निवड यादी व प्रतिक्षा यादी | RTE Admission 2024
कोल्हापूर | आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने, नियमानुसार व पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने राबविली जात असून प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतेही दलाल, संस्था यांच्या प्रलोभनांना बळी पडू नये. पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामधील 25 टक्के कोट्यातील विद्याथों प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील आरटीई पोर्टल या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.
प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत जिल्ह्यातील 325 शाळांमधील 3 हजार 32 जागांसाठी एकूण 3 हजार 894 ऑनलाईन अर्ज पालकांकडून प्राप्त झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) दि. 7 जून 2024 रोजी आयुक्त (शिक्षण) पुणे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली होती. तथापि, उच्च न्यायालय, मुंबई येथे काही संस्थांनी जनहित याचिकांद्वारे हस्तक्षेप याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली नव्हती.
सध्या उच्च न्यायालय, मुंबई यांनी या जनहित याचिकांवर 19 जुलै 2024 रोजी अंतिम निर्णय दिला आहे. त्यानुसार दि. 7 जून 2024 रोजी काढण्यात आलेल्या ऑनलाईन सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी दि. 20 जुलै 2024 रोजी आरटीई पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे.
प्रथम प्रवेश फेरीसाठी निवडलेल्या पालकांच्या मोबाईलवर दि. 22 जुलै 2024 पासून शाळेच्या नावासह SMS पाठविण्यात येत आहेत. मात्र पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स अथवा सिलेक्टेड च वेटिंग लिस्ट या टॅबवर जाऊन आपल्या फॉर्म नंबरद्वारे अर्जाची स्थिती पहावी व पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
RTE Admission 2024: निवड यादी व प्रतिक्षा यादी तपासा (Click Here)
निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी आरटीई पोर्टलवरील अलोटमेंट लेटर सह दि. 23 ते दि. 31 जुलै 2024 या कालावधीत पंचायत समिती / महानगरपालिका स्तरावरील पडताळणी केंद्राकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन पडताळणी समितीमार्फत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.
विहीत कालावधीत प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. ज्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये असेल अशा अर्जासाठी प्रवेशाची पुढील फेरी काढण्यात येईल, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.