गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी | ‘या’ चित्रपटातून गौतमी येतेय तुमच्या भेटीला | Gautami Patil

मुंबई | आपल्या नृत्याने आणि दिलफेक अदाकारीने महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील (Gautami Patil) आता लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने स्वत:च चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीला चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे.

लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरुन गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्रभर चर्चेत आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरुन ती चांगलीच चर्चेत आली होती. तिच्या एका कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्तही समोर आलं होतं. या सर्व प्रकरणानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. आता गौतमी पाटील ही लवकरच चित्रपटात झळकणार आहे. ‘घुंगरु’ असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे.

“माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका नेमकी काय हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा. या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहावा” असेही आवाहन तिने केले आहे.