राजू शेट्टी महाविकास आघाडीत? तिसऱ्या आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी झाली? राजू शेट्टींची प्रतिक्रिया काय? पहा..
कोल्हापूर | विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राज्यातील राजकारणाचं चित्र बदलू लागलं आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याबरोबरच राज्यात तिसरी आघाडी देखील निर्माण झाली होती. मात्र आता तिसऱ्या आघाडीतील घटक पक्ष असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीबरोबर जाणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजू शेट्टी आता महाविकास आघाडीचा घटक असतील अशी बातमी सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. मात्र ही बातमी एका युट्यूब चॅनेलने खोडसाळ पणे प्रसारित केल्याची माहिती स्वतः राजू शेट्टी यांनी दिली आहे.
काय म्हणाले राजू शेट्टी पहा..
काय होती सोशल मिडीयावर व्हायरल होणारी बातमी?
राज्यात विधानसभेला 3 जागा मिळाव्यात सोबतच निवडणुकीनंतर महत्वाचं पद मिळावं असा प्रस्ताव शेट्टी यांच्याकडून महाविकास आघाडीकडे देण्यात आला आहे. त्याबदल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेला महाविकास आघाडीची मित्र पक्ष म्हणून सोबत राहिल असे सांगण्यात येत आहे.
राजू शेट्टी यांनी दिलेल्या प्रस्तावावर गेल्या दोन-तीन दिवसात महत्वपूर्ण आणि सकारात्मक चर्चा घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजू शेट्टी महाविकास आघाडीत सामील होतील अशी शक्यता वाढली आहे. राजू शेट्टी महाविकास आघाडीत सामील झाल्यास त्यांच्या संघटनेला देखील राजकीय पुनर्वसनासाठी त्याचा फायदा होईल असही या बातमी सांगण्यात येत होतं.
राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणूकीवेळी केलेली चूक विधानसभेच्या वेळी करू नये असा देखील मत प्रवाह त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असल्याचे या बातमीत नमूद करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूकीवेळी महाविकास आघाडीने स्वतः राजू शेट्टींना महाविकास आघाडीत सामील व्हा असे सांगितले होते. तसेच हातकणंगले लोकसभेची जागा देखील त्यांच्यासाठी सोडली होती. परंतु राजू शेट्टींनी लोकसभा निवडणूकीत स्वतंत्र लढणार म्हणत महाविकास आघाडीने आपल्याला फक्त पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती.
यामुळे महाविकास आघाडीने त्याठिकाणी आपला उमेदवार दिला होता. परिणामी राजू शेट्टी यांना लोकसभेला केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मतं मिळाल्याचे दिसले. सहाजिकच त्यांचे डिपॉजिट देखील जप्त झाले. त्यामुळे असा प्रकार पुन्हा होऊ नये अशी इच्छा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच महाविकास आघाडीने राजू शेट्टी यांचा प्रस्ताव नाकारल्यास ते महायुतीत जाण्याचा प्रयत्न करून पाहतील असंही या बातमीत सांगण्यात आलं होतं.