News

राजेश क्षीरसागर यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या घरी घेतले भोजन; महापालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा 30 वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी | Rajesh Kshirsagar

कोल्हापूर | गेली ३० वर्षे प्रलंबित असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी हा प्रश्न मार्गी लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पहाटे ५ वाजता कर्मचाऱ्याना सेवेत कायम करण्याच्या निर्णयावर त्यांनी स्वाक्षरी घेतली असून याबाबतचा आदेश क्षीरसागर यांनी स्वतः महापालिकेकडे सादर केला आहे.

गेली ३० वर्षे प्रलंबित असणारा प्रश्न सुटल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांनी याबाबत महापालिकेत जल्लोष करत आपला आनंद व्यक्त केला. रोजंदारी कर्मचाऱ्यांचा महत्वाचा प्रश्न सुटल्याने गेली ३० वर्षे रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सिद्धार्थनगर येथील संजय काळे यांनी याबाबत आनंद व्यक्त करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी राजेश क्षिरसागर यांच्या सोबत स्वतःच्या घरी भोजन करण्याची इच्छाही व्यक्त केली. काळे यांच्या विनंतीला मान देत क्षीरसागर यांनीही संजय काळे व कुटुंबियांच्या घरी भेट देऊन स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

\”जी आयुष्य भरासाठी नवीन भाकरी मिळाली ती तुमच्यामुळे आम्हाला मिळाली, या भाकरीचे खरे मानकरी आपण आहात, ती तुम्ही स्वत: आमच्यासोबत खायला या\” अशी विनंती राजेश क्षीरसागर यांना केली होती.

याबाबत बोलताना राजेश क्षिरसागर म्हणाले की, हे काम आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे काम आहे. कर्मचाऱ्याना न्याय दिल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगत राजेश क्षीरसागर यांनी काळे यांचे आग्रहाचे आमंत्रण स्वीकारल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी आपल्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून रोजंदारी कर्मचारी संजय काळे यांच्या घरी भेट दिली.

यावेळी काळे कुटुंबियांच्या वतीने मोठ्या आनंदाने क्षीरसागर यांचे स्वागत करण्यात आले. क्षीरसागर यांनी कुटुंबातील जेष्ठ नागरिकांची या भेटी दरम्यान आपुलकीने विचारपूस केली. काळे कुटुंबियातील महिलानी देखील भावूक होवून यावेळी आपला आनंद व्यक्त केला.

या भेटी दरम्यान रंगलेल्या गप्पा गोष्ठींमध्ये सिद्धार्थनगर मधील नागरिकांनी क्षीरसागर कुटुंबीयांनी महापूर आणि कोरोना कालावधीत केलेल्या मदतीचा विशेष उल्लेख करत क्षीरसागर यांचे आभार मानले. राजेश क्षीरसागर यांनीही गेल्या काही वर्षापूर्वी माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज निर्माण केला गेला. पण, हा गैरसमज नागरिकांनी मनातून काढावा असे आवाहन करत सिद्धार्थनगर मधील जुन्या आठवणीना उजाळा दिला. तसेच या भागातील नागरिकांच्या सदैव पाठीशी असल्याचे सांगितले.

यावेळी रोजंदारी कर्मचारी संजय काळे यांच्या कुटुंबियांसह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, निलेश हंकारे आदी भागातील जेष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.

Back to top button