गगनबावड्यात 194 मिमी पावसाची नोंद, राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा | Rain update 8 July 2024
कोल्हापूर | मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. कोकण, घाटमाथ्यासह विदर्भातही अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आज (ता. 8) कोकण, घाटमाथा तसेच विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
केरळ ते कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे कोकण अन् घाटमाथ्यावर अतिवृष्टी सुरू आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून प्रशासनाला बचावकार्य हाती घ्यावे लागले आहे. गेल्या 24 तासांत माथेरानमध्ये तब्बल 220 मि.मी. पाऊसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक पाऊस आहे.
Kolhapur Rain Update 8 July 2024: पंचगंगा नदी पात्राबाहेर; 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी, 50 बंधारे पाण्याखाली
जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. मुसळधार पावसाने यावर्षी प्रथमच पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. गेल्या 24 तासांत तुळशी, कुंभी, पाटगाव, चित्री, जंगमहट्टी, जांबरे, सर्फनाल, कोदे, वेसरफ या धरण क्षेत्रांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. घटप्रभा येथे 200 मि.मी. पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी तालुक्यातील राशिवडे व मोहडे येथे घरांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यात. मोहडे येथे चंद्रकांत पांडुरंग पाटील यांच्या तर राशिवडे येथे बाळू दगडू जोग यांच्या घरावर दरड कोसळली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने कळवले आहे.
कोकण, घाटमाथा आणि विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज
समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत पसरला आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. माथेरानमध्ये तब्बल 220 मि.मी. तर रत्नागिरी, राजापूर, पनवेल, फोंडा, कर्जत येथे 120 ते 150 मि.मी. पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावरील गगनबावडा येथे 194, तर लोणावळ्यामध्ये 131 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार; तर बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. सोमवारी 8 जुलै रोजी देखील कोकण, घाटमाथा आणि विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईत झालेल्या तुफान पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत
मुंबई मध्ये रात्री झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई लोकलची सेवा आज विस्कळीत झाली आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर चुनाभट्टी स्थानकामध्ये पाणी साचल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा ठप्प झाली आहे. तर मेन लाईन वर देखील रेल्वे सेवा विस्कळीत आहे. CSMT-Thane जलद मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील सेवा देखील सध्या बंद ठेवण्यात आली आहे. मुंबई लोकल रखडल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांची गैरसोय होत आहे.
मुंबई मध्ये रात्री 6 तासांत 300 मिली पेक्षा जास्त पाऊस बरसल्यानंतर आज सकाळी जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दरम्यान आज दिवसभर देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशामध्ये अनर्थ टाळण्यासाठी समुद्रकिनार्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आज दुपारी भरतीची वेळ 1.57 ची असून लाटा 4.40 मीटर उसळण्याची शक्यता आहे तर ओहोटी रात्री 8.03 ची असून लाटा 1.64 मीटर उसळण्याची शक्यता आहे.