कोल्हापूर जिल्ह्यात पुढील 3 तासात मुसळधार पावसाचा इशारा, पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल; राज्यात देखील पावसाचा हाहाकार | Rain Update 21 July 2024
भारतीय हवामान खात्याने पुढील 3 तासासाठी कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यात आज (21जुलै) पुढील तीन तासांसाठी (Rain Update) हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात एकूण 28.4 मिमी पाऊस झाला असून काल दिवसभरात शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 58.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.41 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – Rain Update 21 July 2024
हातकणंगले- 15.6 मिमी, शिरोळ -7.1 मिमी, पन्हाळा- 29.1 मिमी, शाहूवाडी- 58.4 मिमी, राधानगरी- 29.4 मिमी, गगनबावडा- 35.6 मिमी, करवीर- 21.8 मिमी, कागल- 24.7 मिमी, गडहिंग्लज- 25.6 मिमी, भुदरगड- 41.4 मिमी, आजरा- 42.2 मिमी, चंदगड- 36.2 मिमी असा एकूण 28.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा
राधानगरी 6.41 टीएमसी, तुळशी 2.33 टीएमसी, वारणा 24.57 टीएमसी, दूधगंगा 14.70 टीएमसी, कासारी 1.96 टीएमसी, कडवी 2.33 टीएमसी, कुंभी 1.70 टीएमसी, पाटगाव 3.2 टीएमसी, चिकोत्रा 0.82 टीएमसी, चित्री 1.66 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.23 टीएमसी, सर्फनाला 0.48 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे
राजाराम 37.01 फूट, सुर्वे 35 फूट, रुई 64.11 फूट, इचलकरंजी 60.9 फूट, तेरवाड 53.9 फूट, शिरोळ 45.9 फूट, नृसिंहवाडी 44 फूट, राजापूर 33.5 फूट तर नजीकच्या सांगली 17.3 फूट व अंकली 21.8 फूट अशी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्यात?
- पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी
- ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगांव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी.
- वेदगंगा नदीवरील- म्हसवे, शेणगाव, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली व करडवाडी
- हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, विलजी, ऐनापूर, गिजवणे, जरळी व हरळी
- दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिध्दनेर्ली, सुळकूड व बाचणी.
- कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते सावर्डे व सरुड पाटणे
- वारणा नदीवरील -चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली, माणगाव, खोची व शिगाव.
- भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व शिरगाव.
- कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, मांडुकली व वेतवडे
- कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजार भोगाव,पेंडाखळे, करंजफेण, कुंभेवाडी, सुसकेवाडी, नवलाचीवाडी-1 व नवलाचीवाडी-2
- धामणी नदीवरील- सुळे, पनोरे व आंबर्डे घटप्रभा नदीवरील- हिंडगाव, कानडे-सावर्डे, आडकुर, तारेवाडी, कानडेवाडी, बिजूर भोगोली व पिळणी.
- तुळशी नदीवरील – बीड असे एकूण 79 बंधारे पाण्याखाली आहेत.
राज्यात पावसाचा हाहाकार! आयुक्त, कलेक्टरसह सर्व यंत्रणेला मुख्यमंत्र्यांचे सतर्कतेचे आदेश
राज्यातील बहुतांश भागात सुरूअसलेल्या धुव्वाधार पावसाने (Heavy Rain) सर्वत्र हाहाकार उडवला आहे. काही भागात अतिवृष्टी सदृश्य पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. ग्रामीण भागासह शहरातील अनेक रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे.
दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. पावसाचा सर्वाधिक जोर मुंबई, मुंबई उपनगर, कोकणसह विदर्भात बघायला मिळाला असून मुसळधार पावसाचा फटका स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील बसला आहे.
याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि आप्तकालिन यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा करून सर्व यंत्रणांना सतर्क रहाण्याचे आदेश दिले आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
सर्व प्रशासनाने अलर्ट राहावे, हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे, नागरिकांना त्याबाबत सतर्क करावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी. बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत.
हवामान खात्याशी समन्वय साधावा, त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्टस् (इशारे), माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे. पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत, पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, अशा विविध सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.