कोल्हापुरातील अवैध गर्भलिंग निदान, गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरसह तिघांना अटक
कोल्हापूर }| जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी मोठ्या कारवाईत अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत बोगस डॉक्टर, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि एका अन्य व्यक्तीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोल्हापूर शहरातील फुलेवाडी, बुधवार पेठ व जोतिबा डोंगर येथे छापे टाकण्यात आले.
फुलेवाडीत ‘प्रतीक्षा’ क्लिनिकवर छापा
देवकर पाणंद येथील डॉ. दगडू बाबूराव पाटील यांनी फुलेवाडी येथील तिसरा बसस्टॉप परिसरात ‘प्रतीक्षा’ नावाने क्लिनिक सुरू केले आहे. येथे अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर गुरुवारी दुपारी या क्लिनिकवर छापा टाकून डॉ. पाटील याला ताब्यात घेण्यात आले.
यावेळी पथकातील वैद्यकीय अधिकार्यांनी रुग्णालयाची झाडाझडती घेतली. रुग्णालयाचा कोपरा नि कोपरा व सारा परिसर पिंजून काढला. या तपासणीत पथकाला संशयास्पद औषधे सापडली. यामध्ये काही मुदतबाह्य झालेल्या औषधांचा तसेच उत्तेजित औषधांचा साठा आढळून आला. काही रिकाम्या इंजेक्शनसह बनावट प्रमाणपत्रेही पथकाच्या हाती लागली.
बुधवार पेठेतील सोनोग्राफी मशिन जप्त
या कारवाईनंतर पथकातील अधिकार्यांनी चौकशी सुरू केली. यावेळी बुधवार पेठेतील एका भाड्याच्या घरात आजच सोनोग्राफी मशिन ठेवण्यात आल्याचे समजले. यानंतर पथकाने आपला मोर्चा या घराकडे वळवला. याठिकाणी आढळून आलेले सोनोग्राफी मशिन पथकाने जप्त केले.
जोतिबा डोंगर येथेही छापा
डॉ. पाटील याचे जोतिबा डोंगर येथेही रुग्णालय असल्याची चौकशीत माहिती मिळाली. यानंतर पथकाने जोतिबा डोंगर येथे जाऊन त्या रुग्णालयावरही छापा टाकला. या ठिकाणीही काही संशयास्पद औषधे, कागदपत्रे आढळून आल्याचे पथकातील अधिकार्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ
पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान व गर्भपाताची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या मोठ्या कारवाईनंतर पुन्हा अशा प्रकारची केंद्रे कार्यरत असल्याचे उघड झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
मोठे रॅकेट कार्यरत
पथकाने तिघांना ताब्यात घेतले असले तरी या रॅकेटमध्ये मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीमाभाग आणि कोकण परिसरातही या टोळीचा विस्तार असल्याचा संशय आहे. रुग्णांना शोधणे, त्यांची तपासणी करणे व गर्भपात यासाठी मोठ्या कमिशनवर लोकांना सहभागी करण्याचे प्रकार सुरू आहेत. याचा छडा लावण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.
अटक करण्यात आलेले आरोपी:
- दगडू बाबूराव पाटील ऊर्फ डी. बी. पाटील (वय 45, रा. देवकर पाणंद)
- गजेंद्र बापूसो कुसाळे (वय 37, रा. शिरसे, ता. राधानगरी)
- बजरंग श्रीपती जांभिलकर (वय 31, रा. महाडिकवाडी, ता. पन्हाळा)
याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कोल्हापूर | कोल्हापुरातील फुलेवाडी येथील प्रतीक्षा क्लिनिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान चाचणी सुरू असल्याच्या माहितीच्या आधारे आरोग्य विभागाने छापा टाकला. या कारवाईत गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्याही जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्ह्यातील अजून एका ठिकाणी तपासणी करण्यात आली असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या औषधांची विक्री होत असल्याच्या संशयातून फुलेवाडी येथील डॉ. डी. बी. पाटील यांच्या प्रतीक्षा क्लिनिकवर आरोग्य विभागाने आज, गुरुवारी (दि. १९) छापा टाकून कारवाई केली. संशयित डॉ. डी. बी. पाटील यांच्या जोतिबा डोंगर येथील क्लिनिकचीही तपासणी कारवाई पथकाकडून सुरू आहे. या कारवाईने पुन्हा एकदा शहरासह जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
देवकर पाणंद येथील डॉ. डी. बी. पाटील यांचे जोतिबा डोंगर येथे क्लिनिक आहे. दीड महिन्यांपूर्वी त्यांनी फुलेवाडी येथील तिसऱ्या बस स्टॉपजवळ प्रतीक्षा क्लिनिक सुरू केले होते. या क्लिनिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानुसार खात्री करून पथकाने गुरुवारी सकाळी प्रतीक्षा क्लिनिकमध्ये छापा टाकला. यावेळी क्लिनिकमध्ये काही संशयास्पद औषधेही सापडल्याची माहिती पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गर्भलिंग निदानाचे वाढते प्रकार:
जिल्ह्यात मुलगी नको, मुलगा पाहिजे या मानसिकतेमुळे गर्भलिंग तपासणी व अवैध गर्भपाताचे प्रकार वाढले आहेत. गेल्या 16 वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकरणांवर 22 खटले दाखल झाले आहेत. आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे हे प्रकार बिनधास्त सुरू असल्याचा आरोप होत आहे.
शासनाची बंदी असूनही अवैध धंदे सुरूच:
गर्भलिंग निदानावर बंदी असूनही कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. राज्यातील सर्वाधिक कारवाया या जिल्ह्यात झाल्या असूनही या अवैध प्रकारांना पूर्णतः आळा घालता आलेला नाही. गर्भलिंग निदानासह गर्भपातही मोठ्या प्रमाणात केल्याचे प्रकार समोर येत आहेत.
प्रमुख ठिकाणांवरील कारवाया:
हरिओमनगर, फुलेवाडी, अंबाई टँक रंकाळा, पडळ, आमजाई व्हरवडे, मडिलगे, परिते, वरणगे पाडळी, आंबेवाडी – चिखली रोड यांसह विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रशासनाकडून कडक उपाययोजनांची गरज:
जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.