नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मोदी अडनाव प्रकरणामध्ये राहुल गांधींना गुजरात हायकोर्टाने सुनालेली शिक्षा रद्द केली आहे. या निकालामुळे राहुल गांधींची खासदारकी वाचली असून आता ते पुन्हा संसदेमध्ये जाऊ शकणार आहेत.
सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये म्हणटले की, राहुल गांधींना या प्रकरणात सर्वाधिक म्हणजेच 2 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र ही शिक्षा का सुनावली हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. तसेच त्यांनी या प्रकरणाचा पूर्णपणे विचार केलेला दिसत नाही, त्यामुळे हायकोर्टाच्या शिक्षेच्या निकालाला स्थगिती दिली. या निकालानंतर राहुल गांधींनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया…
सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतर राहुल गांधींनी ट्वीटरवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “काहीही झालं तरी माझी जबाबदारी कायम राहणार आहे. ती म्हणजे इंडिया या संकल्पेचं संरक्षण करणं,” अशा अर्थाचं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे रद्द करण्यात आली होती. मोदी आडनाव खटल्यात ही खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या निर्णयाविरोधात दाद मागितली होती.
गुजरात न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी आज न्यायमूर्ती गवईंच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर झाली. सुनावणीनंतर निकाल देताना राहुल गांधींना सर्वाधिक शिक्षा देण्याची गरज नव्हती, असे न्यायमूर्तींनी नमूद केले. तसेच, सर्वाधिक शिक्षा देण्याचे कोणतेही सबळ कारण गुजरात न्यायालयाने नमूद न केल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना दोषी मानण्याच्या आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे.