News

राधानगरी विधानसभा मतदारसंघात प्रकाश आबिटकरांची आमदारकीची हॅट्रिक; केपींची मशाल पेटलीच नाही! Radhanagari Vidhan Sabha Election Result 2024

Radhanagari Vidhan Sabha Election Result 2024 : राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रकाश आबिटकर यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. पहिल्यांदाच या मतदारसंघातून एखाद्या आमदाराने सलग तीन वेळा विजय प्राप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आबिटकरांच्या विजयामुळे मात्र माजी आमदार के पी पाटील यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

राधानगरी विधानसभा मतदार संघात प्रकाश आबिटकर शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून केपी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पाटील आणि प्रकाश आबिटकर यांच्यामध्ये पुन्हा एकदा सामना रंगला होता. यापूर्वी झालेल्या बिद्री साखर कारखाना निवडणुकीत केपी पाटील आणि प्रकाश आबिटकर आमने सामने आले होते. मात्र, के पी पाटील यांनी एकहाती कारखान्याची निवडणूक जिंकली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये कोण कोणाचा काटा काढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

कोल्हापूर जिल्ह्यातून शिंदे गटाच्या राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकरांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता

राधानगरी मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी प्रचाराची पहिली सभा घेतली होती. यावेळी त्यांनी गद्दाराला पराभूत करा, असं आवाहन केलं होतं. मात्र, प्रकाश आबिटकर गद्दारीचा शिक्का पुसून विजयी होण्यात यशस्वी ठरले आहेत. आबिटकर यांची मतदारसंघातील विकास कामे त्यांच्यासाठी निर्णयाक ठरली आहेत.

या मतदारसंघांमध्ये केपी पाटील यांचे मेहुणे ए वाय पाटील यांनी सुद्धा बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीचा कोणाला फटका बसणार? याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांच्या बंडखोरीचा फारसा प्रभाव या दोघांवर झालेला दिसून येत नाही. प्रकाश आबिटकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत तिसऱ्यांदा आमदारकी पटकावली आहे.

राज्यात महायुती सत्तेत असल्याने आबिटकर मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या प्रचार दौऱ्यामध्ये याबाबत सुतोवाच केले होते. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातूनही राजेश क्षीरसागर यांनी राजेश लाटकर यांच्या विरोधात विजय खेचून आणला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून प्रकाश आबिटकर आणि प्रकाश आबिटकर मंत्रीपदाच्या शर्यतीत असणार आहेत. 

Back to top button