पुरी येथील जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; एका भाविकाचा मृत्यू, 400 जखमी | Puri Jagannath Rath Yatra 2024
Puri Jagannath Rath Yatra 2024: हाथरस येथील चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच, भगवान जगन्नाथाची रथयात्रा उत्सवात आज चेंगराचेंगरी झाल्यामुळे 400 हून अधिक भाविक खाली पडले. यात एका भाविकाचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झालेत. जखमींवर पुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रथयात्रेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांच्यासह लाखो भाविक सहभागी झाले होते.
चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील अनेक भाविकांना किरकोळ दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. गंभीर जखमी भाविकांवर उपचार सुरू आहेत. या अपघातात जीव गमावलेला भाविक ओडिशाच्या बाहेरचा असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. त्याचबरोबर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवान जगन्नाथाचा नंदीघोष रथ ओढण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर काही भाविकांमध्ये बाचाबाची झाल्याने अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात 400 हून अधिक भाविक खाली पडले. यावेळी खाली पडून भाविक जखमी झाले. यातच एकाचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला आहे.
द्रौपदी मुर्मू शंकराचार्यांनी घेतले दर्शन
पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी त्यांच्या शिष्यांसह भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथांचे दर्शन घेतले. यानंतर पुरीच्या राजाने \’छेरा पहानारा\’ (रथ साफ करणे) विधी पार पाडला आणि सायंकाळी 5.20 च्या सुमारास रथ ओढण्याची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनीदेखील रथांचे दर्शन घेतले.
10 लाख भाविक सहभागी
शहरातील प्रमुख मार्गावरून रथयात्रा संथगतीने पुढे सरकत होती. एका अंदाजानुसार, सुमारे 10 लाख भाविक रथ उत्सवात सहभागी झाले होते. बहुतांश भक्त ओडिशा आणि शेजारील राज्यांतील होते. रथयात्रेत परदेशातूनही अनेक जण सहभागी झाले होते. पुरीचे पोलीस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी सांगितले की, रथयात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 180 प्लाटून (एका प्लाटूनमध्ये 30 सैनिक असतात) सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पुरी रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आरोग्यमंत्री मुकेश महालिंग यांनी जिल्हा मुख्य रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले. आरोग्यमंत्र्यांनी जखमीशी चर्चा केली. तसेच कोणत्या परिस्थितीत चेंगराचेंगरी झाली आणि अशी परिस्थिती कशामुळे निर्माण झाली याची माहिती देखील जाणून घेतली.