ताम्हिनी घाटातील धबधब्यात स्टंटबाजी करताना तरूण बुडाला; पहा घटनेचा व्हायरल व्हीडीओ | Tamhini Ghat Viral Video
पुणे | ताम्हिनी घाटात वर्षापर्यटनाच्या वेळी स्टंटबाजी करणे एका तरूणाच्या जिवावर बेतले आहे. स्टंटबाजी करण्याच्या उद्देशाने वाहत्या धबधब्यात उडी मारल्याने हा तरूण वाहून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Tamhini Ghat Viral Video) होत आहे. स्वप्नील धावडे (रा. पिंपरी-चिंचवड) असे या युवकाचे नाव असून, तो राष्ट्रीय खेळाडू असल्याचे समजते.
स्वप्नील धावडे हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी आला होता. शनिवारी हा ग्रुप ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे गेला होता. ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर काही वेळातच तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाल्याचे व्हीडीओ मध्ये दिसत आहे.
स्वप्नील धावडे हा बॉक्सिंगमधील राष्ट्रीय खेळाडू होता. त्याच आधारे त्याने भारतीय सैन्यात देखील सेवा बजावली आहे. 18 वर्षांच्या सेवेनंतर स्वप्नील मागील वर्षी निवृत्त झाला आहे. त्याची पत्नी पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो उंचावरून धबधब्यात उडी मारताना दिसत आहे. पौड पोलिस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, शिवदुर्ग टीम लोणावळा यांनी प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन्ही कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध घेतला. मात्र, या टीमला कोठेही स्वप्नीलचा मृतदेह आढळला नाही.
दरम्यान, रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत पुन्हा शोधकार्य हाती घेण्यात आले. त्यानंतर आज सोमवारीही सकाळी पुन्हा या ठिकाणी शोधकार्य सुरू होते. अखेर स्वप्निलचा मृतदेह आज रायगड जिल्ह्यातील मानगाव येथे आढळून आला.
ताम्हीनी घाटातील प्लस व्हॅली मधे एकुण तीन कुंड आहेत. पहिल्या कुंडातील पाणी धबधब्यातून वाहत मधल्या कुंडात जाते आणि तिथून ते सर्वात खाली असलेल्या कुंडात जाते. स्वप्नील धावडे आणि त्यांची टीम पावसाळा सुरु होण्यापूर्वी याच कुंडांमधे पोहण्यासाठी उतरले होते. मात्र तेव्हा पाण्याला फारसा जोर नव्हता.
शनिवारी ते आणि त्यांची टीम पुन्हा प्लस व्हॅली मधील सर्वात वरच्या कुंडाजवळ गेले. स्वप्नील धावडे याने त्यांच्या जीम मधील सहकाऱ्यांसमोर फेसाळत्या पाण्यात उडी मारली. सुरुवातीला त्याने काठावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र धबधब्याच्या टोकाला आल्यानंतर त्याची दगडावरील पकड निसटली आणि तो धबधब्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला.