News

Pune Rain Update: पुण्यात आर्मी… पावसाचा हाहाकार, 4 जणांचा मृत्यु, जनजीवन विस्कळीत, पूर पीडितांच्या मदतीसाठी 85 जणांची टीम तैनात

पुणे | पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं (Pune Weather Update) हाहा:कार माजवला आहे. मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील पूरपरिस्थिती गंभीर बनल्यानं पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच नागरिकांच्या बचावासाठी आणि त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे.

चौघांचा दुर्दैवी मृत्यू
पुण्यात विजेचा धक्का लागल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील भिडे पुलाजवळ ही घटना घडली आहे. अंडा भुर्जीचा स्टॉल सुरक्षित ठिकाणी नेत असताना ही दुर्दैवी घटना घडली. तर, ताम्हिणी घाटात एका छोट्या भोजनालयावर दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. लवासा परिसरातील एका बंगल्यात तीन जण चिखलात अडकल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पुण्यात मुसळधार पावसामुळे (Pune Heavy Rain)अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. पुण्याच्या नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीवरुन लष्कराचे बचाव आणि मदत कार्य पथक एकता नगर मध्ये बचावकार्यासाठी दाखल झालं आहे. या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी कृती दल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असून या पथकासोबत आपत्तीने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी तसेच तत्पर आणि परिणामकारक मदतकार्यासाठी आवश्यक बचाव बोटी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देण्यासाठी टीम सज्ज करण्यात आली आहे.

लष्कराची 85 जणांची टीम तैनात

पुण्यातील पुरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, लष्कराच्या अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आलं आहे. वेळ आलीच तर अगदी कमी वेळात ही पथके आवश्यकता असेल तेथे त्वरित पोहोचू शकतील असं नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडमधील अधिकारी नागरी प्रशासन तसेच इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधत, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

स्थानिक प्रशासनाकडून लष्कराच्या मदतीसाठी विनंती करण्यात आली. या विनंतीला प्रतिसाद देत लष्कराच्या कृती दलाला प्रभावित भागाकडे तातडीने पाठवण्यात आले. एकूण 85 जणांचा समावेश असलेल्या या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट आणि लष्करी रुग्णालये तसेच इतर तज्ञ घटकांतील वैद्यकीय पथके सहभागी आहेत.

भारतीय सशस्त्र दले  तयारीत 

लष्कराचे जवान बचाव आणि मदत कार्यात संपूर्णपणे सहभागी झाले आहेत. गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलाला देखील सज्ज राहण्यास सांगितले आहे.

Back to top button