News

पुणे: पर्यटकांसाठी \’या\’ ठिकाणचे सुप्रसिद्ध धबधबे बंद! नियम मोडल्यास होईल जेल मध्ये रवानगी.. जाणून घ्या सविस्तर | Pune Rain Tourism

पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन अभयारण्यातील सर्व निसर्गवाटा 1 जुलै ते 30 सप्टेंबरदरम्यान पर्यटनासाठी बंद

पुणे | सध्या वर्षा पर्यटनासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढतेय. पण वर्षा पर्यटनात झालेल्या अपघातात अनेकजणांचा मृत्यू झाल्याच्या घटना गेल्या दोन दिवसात समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वर्षा पर्यटनांच्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत.

Pune Rain Tourism: भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातील वर्षा पर्यटनाच्या बाबतीत असाच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत याठिकाणी पर्यटन बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांनी वर्षा सहलीसाठी या भागात येऊ नये, नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश वन विभागाकडून देण्यात आले आहेत.

सुट्टीच्या दिवशी पुणे, मुंबईसह अनेक भागांमधून पर्यटक भीमाशंकर इथे येताना दिसतात. सध्या याठिकाणच्या धबधब्यांच्या पाण्याचा जोर प्रचंड वाढला आहे. जर पोहताना प्रवाहाचा अंदाज आला नाही तर जीवघेणा अपघात घडू शकतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, भीमाशंकर देवस्थान येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अभयारण्यात फिरताना नियमांचे पालन करावे लागणार आहे. परवानगीशिवाय अवैधपणे अभयारण्यात प्रवेश करता येणार नाही. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर ‘वन्यजीव संरक्षण कायद्या’अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

या परिसरातील इतर धबधबेसुद्धा पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहेत. यामध्ये कोंढवळ धबधब्याकडे जाणारे सर्व मार्ग, चोंडीचा धबधबा – खोपीवली नियतक्षेत्र, न्हाणीचा धबधबा – पदरवाडीजवळ, सुभेदार धबधबा – नारीवली नियतक्षेत्र, घोंगळ घाट नाला – खांडस ते भीमाशंकर मार्ग, शिडी घाट – पदरवाडी ते काठेवाडी पूर्णतः बंद करण्यात आले आहे.

Back to top button