पुणे | पुणे महापालिकेच्या शाळांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेशे शिक्षक नसल्याने शैक्षणिक गुणवत्तेचा व विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Pune Mahapalika Shikshak Bharti 2023)
पुणे महापालिकेतील एकूण शिक्षकांच्या जागांपैकी ७२७ जागा रिक्त होत्या. आंतरजिल्हा बदलीतून महापालिकेला २१९ शिक्षक प्राप्त झाल्याने अद्यापही ५०८ जागा रिक्त आहेत. पण शासनाकडून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रियाच केली जात नसल्याने महापालिका प्रशासन देखील हतबल झाले आहे. (Pune Mahapalika Shikshak Bharti 2023)
पुणे महापालिकेच्या शहरात मराठी, उर्दू, कन्नड, इंग्रजी माध्यमाच्या मिळून एकूण २८४ शाळा आहेत. या ठिकाणी बालवाडी पासून ते इयत्ता १०वी पर्यंत शिक्षण दिले जाते. शहरातील ९३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.
या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसह इतर सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असतात. वर्गखोल्या वाढविण्यासाठी भवन विभागातर्फे तरतूद केली जाते. गेल्या काही वर्षापासून इ लर्निंग, विविध प्रकारच्या प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यावरही महापालिकेचा भर आहे. या गोष्टींवर भर असला तरीही विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
गेल्या काही वर्षापासून महापालिकेच्या शाळेतील शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नव्याने शिक्षक भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्त जागांची संख्या वाढत गेली आहे. त्यातच महापालिकेत हद्दीलगतची ३२ गावे समाविष्ट झाल्यानंतर तेथील रिक्त जागांमुळे ही संख्या वाढली आहे.
महापालिकेच्या जुन्या हद्दीतील शाळांमधील शिक्षकांच्या ३१७ जागा रिक्त आहेत, तर समाविष्ट गावातील रिक्त जागांची संख्या ३५० इतकी आहे. गेल्या दीड वर्षात महापालिकेकडे २१९ आंतरजिल्हा बदल्यांचे प्रकरणे आली होती. त्यास नुकतीच महापालिका प्रशासनाने मान्यता दिली. त्यामुळे येत्या काळात महापालिकेकडे २१९ शिक्षक उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रिक्त जागांची संख्या घटून ७२७ वरून ५०८ इतकी झाली आहे. पण अद्याप यातील अनेक शिक्षक महापालिकेकडे रुजू झालेले नाहीत.