News

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 28 जुलैला कोल्हापुरात; \’असे\’ आहे दौऱ्याचे नियोजन | President Draupadi Murmu

कोल्हापूर | भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 28 जुलै रोजी त्यांचा नियोजित दौरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दि. 28 जुलै रोजी सकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्या वारणेला विविध कार्यक्रमासाठी हजेरी लावतील. वारणा येथे नव्याने मान्यता मिळालेल्या वारणा विद्यापीठाच्या उद्दघाटनाचा कार्यक्रम याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली दौऱ्याच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रपतींचे आगमन, स्वागत, सुरक्षा यासह संपूर्ण दौऱ्याच्या नियोजनावर शुक्रवारच्या बैठकीत चर्चा झाली.

त्यानुसार प्रत्येक संबंधितांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन त्यांना दौऱ्याच्या नियोजनाच्या तयारीबाबत सूचना दिल्या आहेत. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.

यापूर्वी भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिवाजी विद्यापीठाच्या उद्गाटनासाठी 1962 साली कोल्हापुरात आले होते. त्यावेळी बालकल्याण संकुलाच्या इमारतीचे उद्गाटन त्यांच्या हस्ते झाले होते. त्यापूर्वी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या विनंतीवरून त्यांनी उपराष्ट्रपती असताना भक्तिसेवा विद्यापीठ हायस्कूलला 1955 च्या सुमारास भेट दिली होती. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुलकलाम आणि प्रतिभाताई पाटील यांनी देखील कोल्हापूरला भेट दिली आहे. कलाम यांनी देखील त्यावेळी वारणेला भेट दिली होती. त्यानंतर प्रथमच दीर्घ कालावधीनंतर देशाच्या राष्ट्रपती कोल्हापुर दौऱ्यावर येत आहेत.

Back to top button