
PRATIBHA SETU Scheme for UPSC Students : “स्वप्न अपूर्ण राहिलं, प्रवास वाया गेला!” अशा भावनेने अनेक यूपीएससी उमेदवारांची अवस्था होते. आयएएस, आयपीएस होण्यासाठी झटणारे हजारो जण वर्षानुवर्षे अभ्यास करतात, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचतात… पण अंतिम यादीत नाव न आल्याने त्यांचं स्वप्न अपूर्ण राहतं. वयोमर्यादा ओलांडल्यावर हीच स्वप्नं आता पुढे काय? या प्रश्नापाशी येऊन पोहचतात…
मात्र आता UPSC ने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे, जे या उमेदवारांचा प्रवास व्यर्थ ठरू देणार नाही. ‘प्रतिभा सेतू‘ नावाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलेले पण अंतिम निवडीत अपयशी ठरलेले उमेदवार आता सरकारी वा खासगी संस्थांमध्ये थेट नोकरीसाठी पात्र ठरणार आहेत.
‘प्रतिभा सेतू’ म्हणजे काय? PRATIBHA Setu UPSC
UPSC च्या माहितीनुसार, ही योजना एक डिजिटल ब्रिज आहे – ज्यामुळे सरकारी मंत्रालयं, सार्वजनिक उपक्रमं, स्वायत्त संस्था आणि नामवंत खासगी कंपन्या थेट या उमेदवारांशी संपर्क करू शकतात. त्यांच्या कष्टाचं चीज होऊन, त्यांना योग्य ती संधी दिली जाईल.
योजना कशी काम करेल? – PRATIBHA SETU Scheme for UPSC Students
पूर्वी UPSC अशा उमेदवारांची माहिती निवडक कंपन्यांना देत असे. पण आता ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व औपचारिक झाली आहे. ‘प्रतिभा सेतू’ पोर्टलवर कंपन्या नोंदणी करून (CIN देऊन) पात्र उमेदवारांचा डेटा पाहू शकतात आणि थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.
कोण पात्र आहे?
नागरी सेवा परीक्षा, भारतीय वन सेवा, CAPF, अभियांत्रिकी सेवा, संयुक्त वैद्यकीय सेवा, भारतीय आर्थिक व सांख्यिकी सेवा, संयुक्त संरक्षण सेवा अशा प्रमुख परीक्षांमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलेले पण अंतिम यादीबाहेर गेलेले उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
ही योजना का आहे खास?
- उमेदवारांचा अनुभव व प्रतिभेचा योग्य सन्मान
- UPSC चे गुणवत्ताधारित मूल्यांकन – कंपन्यांना थेट उपयोग
- करिअरची नवीन दिशा – सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात संधी
यूपीएससीचा हा उपक्रम केवळ एक योजना नाही, तर अपूर्ण स्वप्नांना नवी दिशा देणारा आशेचा किरण आहे. ज्यांनी वर्षानुवर्षे प्रयत्न केले, ते आता नव्या रूपात देशाच्या प्रगतीत आपले योगदान देऊ शकतील – हीच खरी ‘प्रतिभेची सेतू’ आहे!