आवाडे पिता पुत्राचा भाजप प्रवेश निश्चित! सुरेश हाळवणकरांचं काय होणार?
कोल्हापूर | महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणूकीची पूर्वतयारी करण्यात राजकीय मंडळी व्यस्त झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून देखील महायुतीमध्ये अनेकांची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधल आहे.
महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ भाजपला जाण्याची शक्यता असल्याने माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यात उमेदवारीसाठी चढाओढ निर्माण झाली आहे. तत्पूर्वी लोकसभा निवडूकीवेळी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांचे पुत्र राहुल आवाळे यांची उमेदवारी घोषित करून थेट भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला आव्हान दिले होते. शेवटी विधानसभेचा शब्द देऊन त्यावेळी त्यांची मनधरणी महायुतीतील वरिष्ठांनी केली होती. त्यामुळे विधानसभेला पुन्हा आवाडे विरोधात जाण्याऐवजी अडचण निर्माण झालेल्या भाजपने आवाडे यांनाच भाजपवासी करून घेण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.
आमदार प्रकाश आवाडे आणि पुत्र राहुल आवाडे आज बुधवारी (25 सप्टेंबर) केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी त्यांनी मुंबई दिवसभर तळ ठोकून उमेदवारी पक्की करून घेतल्याचे सांगितले जाते. आमदार आवाडे यांनी दिवसभर मुंबईत तळ ठोकल्यानंतर रात्री आठपासून त्यांच्या समर्थकांमध्ये भाजप प्रवेशाबाबतची कुजबूज सुरू झाल्याचे पहायला मिळत होते. तर भाजपच्याही प्रमुख पदाधिऱ्यांना याबाबतचा संदेश पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आवाडे यांची राजकीय कारकिर्द पाहता आवाडेंचे घराणे काँग्रेस पक्षाशी अत्यंत निष्ठावंत मानले जात होते. त्यांचे वडील कल्लापाण्णा आवाडे हे काँग्रेस पक्षाचे खासदार देखील होते. तसेच स्वत प्रकाश आवाडे यांनी आमदारकीसोबत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. तसेच अनेकदा राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री पद देखील भूषवले आहे. असे असताना देखील आवाडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला \’रामराम\’ ठोकत विधानसभा अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या पाच वर्षात त्यांनी भाजपसोबत कामही केले आहे. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीकता वाढल्याने ते शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती.
माजी आमदार हाळवणकर यांच्या भूमिकेकडे लक्ष..
आमदार आवाडेंच्या भाजप प्रवेशाचा वरिष्ठ पातळीवरुन निर्णय झाल्यामुळे स्थानिक भाजपमधून अद्याप तरी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आमदार आवाडे यांचे राजकीय कट्टर विरोधक म्हणून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडं पाहिले जातं. विधानसभा निवडणुकीला तेही इच्छुक आहेत. त्यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र, राहुल आवाडे हे उमेदवारीचा शब्द घेऊन आल्याची माहिती असून त्यांचा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आवाडे पिता-पुत्र भाजपमध्ये आल्यास माजी आमदार सुरेश हाळवणकर हे कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.